साकळी मंडळाधिकार्यास मारहाण करीत डंपर लांबवले
यावल : अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणारा डंपर साकळी मंडळाधिकार्यांनी पकडल्यानंतर संबंधितानी मंडळाधिकार्यास शिविगाळ करीत मारहाण करून डंपर पळवल्याची धक्कादायक घटना गुरुवार, 13 रोजी रात्री एक वाजता डांभूर्णी गावातील बसस्थानकाजवळ घडली. या प्रकरणी विक्की नेहते (डांभूर्णी) याच्याविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाळू माफीयांची मुजोरी वाढली
साकळी मंडळाधिकारी सचिन तुळशिराम जगताप (मोहाडी रोड, इंग्लिश स्कूल, जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्यासह पथकाने आरोपी विक्की नेहते यास अवैधरीत्या वाळूची वाहतूक करताना डांभूर्णी गावाजवळ पकडले मात्र नेहते याने जगताप यांना शिविगाळ करीत मारहाण करून ढकलून दिले तसेच डंपरमधील वाळू रस्त्यावर खाली करून डंपरसह पळ काढला. तपास उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहेत.
