राज्यातील पालिका निवडणुकांबाबत हायकोर्टात होणार फैसला : हस्तक्षेपास ‘सुप्रीम’ नकार
नवी दिल्ली : राज्यातील महापालिका, नगरपालिका निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत येताच पूर्वीच्या प्रभाग रचनेत बदल केले आहेत तसेच नगराध्यक्षाची निवडणूक थेट जनतेतून करण्याचाही निर्णय घेतला आहे. या निर्णयांना सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. मात्र, यात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.
आधी जावे हायकोर्टात
याचिकाकर्त्यांनी या मागणीसाठी आधी हायकोर्टात जावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राज्यातील पालिका निवडणुकांचा फैसला आता हायकोर्टात होण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीसंदर्भात मे महिन्यात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने तातडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची सूचना केली होती. राज्य सरकारने पावसामुळे निवडणुका घेणे अडचणीचे होऊ शकते, असे सांगितल्यावर जेथे पाऊस कमी आहे किमान तेथे तरी निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. परंतु त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा वॉर्ड रचनेत बदल केले. त्यामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या.

