चोरट्यांची जळगावात दिवाळी : आठवडे बाजारातून एकाचवेळी आठ मोबाईल लांबवले : टोळके जाळ्यात
जळगाव : चोरट्यांनी एकाच वेळी तब्बल आठ जणांचे मोबाईल लांबवल्याची घटना शहरातील पिंप्राळा येथील आठवडे बाजारात घडली. या प्रकरणी बुधवार, 19 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वाजता पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
भाजीपाला खरेदी करताना लांबवला मोबाईल
राजेश पुंडलिकराव सूर्यवंशी (51, विद्युत कॉलनी, जळगाव) हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. पिंप्राळा येथे बुधवारच्या आठवडे बाजारात राजेश सुर्यवंशी हे सायंकाळी सहा वाजता गेले असता बाजारात भाजीपाला खरेदी करतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिश्यातील 11 हजारांचा महागाडा मोबाईल लांबवला. दरम्यान त्यांनी अधिक चौकशी केली असता याच बाजारातील इतर 7 जणांचे देखील महागडे मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेले. यासंदर्भात रामानंदनगर पोलिसांना कळविण्यात आले.

चोरट्यांची टोळी ताब्यात
पोलिसांनी आठवडे बाजारातून संशयित आरोपी सिद्धार्थ श्रावण चव्हाण, करणकुमार चंचल चव्हाण, राहुल कुमार चव्हाण, अर्जुनकुमार चंचल चव्हाण, अजय गंगाराम चव्हाण (सर्व रा. खदान रोड, अकोला) या पाच जणांच्या टोळीला ताब्यात घेतले. त्यांच्यावर रात्री 11.30 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात राजेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.