भुसावळात इनरव्हील व रोटरी क्लबतर्फे महिलांची मोफत आरोग्य तपासणी
भुसावळ : इनरव्हील क्लब व रोटरी क्लब, अमरावती मिडटाऊन तसेच महिला कल्याण समिती आयुध निर्माणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयुध निर्माणी कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ सुमारे 150 महिलांनी घेतला. डॉ.पंजाबराव देशमुख मेमोरीयल मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून मेमोग्राफी बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आरोग्य शिबिरात आयुध निर्माणीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबांमधील जवळपास 150 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कॅन्सर तपासणी व मार्गदर्शन
शिबिराचे उद्घाटन डॉ.वनिता पुरी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी महिला समितीच्या अध्यक्षा दिपाशिखा, आयुध निर्माणीचे महाप्रबंधक राजीव पुरी, रजनी सावकारे यांची उपस्थिती होती. शिबिरादरम्यान स्तनांतील कॅन्सर तसेच ग्रीवा कॅन्सरची तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले. मेमोग्राफी तपासणीसाठी डॉ.सोनल लांडगे उपस्थित होत्या. स्तनांच्या कॅन्सर विषयी महिलांमध्ये जागरुकता नाही. सुविधांचा अभाव असल्यामुळे गरीब महिलांना कॅन्सर तपासणीचा खर्च परवडत नाही. त्यामुळे गरीब महिला तपासणी करणे टाळतात. यासाठी मोफत शिबिर हे अतिशय महत्वाचे साधन असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



