मनाचे दीप उजळले की, पानगळही सुंदर होते : संदीप पाटील

ज्येष्ठांशी संवाद : भुसावळ शहरातील वेडी माता ज्येष्ठ नागरीक संघाचा उपक्रम


भुसावळ : जे टाळता येत नाही त्याचा स्वीकार केला तर नवा मार्ग सापडतो. वृद्धत्वाची कारण जाणून घेऊन शरीरात, मनात आणि समाजात होणार्‍या बदलांचे नवे अर्थ शोधण्याचा प्रयत्न करून स्वतःच्या स्थितीचे परीक्षण करून पुढच्या आयुष्याचं नियोजन करा. सावल्या उजेडात आणल्याशिवाय नवे मार्ग सापडत नाहीत. मनाचे दीप उजळतात तेव्हा अडचणी संधी बनून येतात आणि मग पानगळही सुंदर होते, असे विचार अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी येथे व्यक्त केले. रविवार, 13 रोजी भुसावळ हायस्कूलमध्ये झालेल्या वेडी माता ज्येष्ठ नागरीक संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘रीकाम्या वेळेचं करायचं तरी काय ?’ या विषयावर त्यांनी ज्येष्ठांशी सवांद साधला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
या प्रसंगी व्यासपीठावर वेडी माता ज्येष्ठ नागरीक संघ अध्यक्ष रामदास खर्चे, उपाध्यक्ष बी.एल.पाटील उपस्थित होते. वेळ खूप आहे पण तो वापरायचा कसा यावर वृद्धांचे आरोग्य अवलंबून असत. शारीरिक स्वास्थ्यासाठी व्यायाम, मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, सामाजिक आरोग्यासाठी दुसर्‍यांच्या अडचणी ओळखून मदत करणं, मेंदूच्या आरोग्यासाठी टी.व्ही.च्या आहारी न जाणे, आर्थिक आरोग्यसाठी भावनेच्या आहारी न जाता निर्णय घेणे, कौटूंबिक आरोग्यासाठी अहम बाजूला ठेवून नव्या विचारांचा स्वीकार करण हे नियोजन पूर्वक केलं तर दिवससुद्धा कमी पडेल अश्या भावना यावेळी संदीप पाटील यांनी व्यक्त केल्या.



नव्या परीस्थितीतील चांगल्याचा स्वीकार करावा
जून तेच सोनं अशा ताठर भूमिकेतून नव्या बदलांकडे न पाहता जेष्ठांनी नव्या परीस्थितीतील चांगल्याचा स्वीकार करावा. तरुण पिढीचा चंगळवाद, नवीन पिढीची स्वयंकेंद्रित मनोवृत्ती याचा सर्वात प्रथम आणि गंभीर परिणाम ज्येष्ठांवर होत आहे. या बदलांचा वेग आणि दिशा जेष्ठांसाठी मोठी समस्या आहे. जेष्ठांनी या विषयी मोकळं बोललं पाहिजे. शेजारी, समाज, संस्था यांनी ज्येष्ठांच्या पाठीशी उभं रहायला हवे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. कार्यक्रमाची सुरवात पसायदानाने झाली. कार्यक्रमाच्या शेवटी नोव्हेंबर महिन्यातील संघातील सदस्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्रास्तविक मेघश्याम फालक यांनी केले तर सूत्रसंचालन सुरेश फाळके यांनी तर आभार राजेंद्र जावळे यांनी मानले. या प्रसंगी माजी नगरसेवक वसंत दादा पाटील, दिलीप पाटील आणि परीसरातील जेष्ठ नागरीक मोठ्या संख्यने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !