राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा ही परीवर्तनाची नांदी ठरेल : विनोद तराळ
मुक्ताईनगर : रोहिणी खडसे यांच्या संकल्पनेतील राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेला मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महिलावर्ग आणि युवा वर्गाचा संवाद यात्रेतील सहभाग लक्षणीय असून मुक्ताईनगर विधानसभेत जनसंवाद यात्रा ही परीवर्तनाची नांदी ठरेल, असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ यांनी अंतुर्ली येथील जाहीर सभेत व्यक्त केला.
आगामी काळात राष्ट्रवादीची वाढणार ताकद
विनोद तराळ पुढे म्हणाले की, आगामी सर्व निवडणुकांमध्ये जनसंवाद यात्रेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. रोहिणी खडसे यांच्याकडे नाथाभाऊंप्रमाणेच असलेली काम करण्याची तत्परता आणि जनसामान्यांची कळवळ यामुळे त्या आदरणीय नाथाभाऊंचाच कित्ता गिरवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करीत असलेल्या रोहिणी खडसे यांच्याकडे संपूर्ण मुक्ताईनगर मतदारसंघ भविष्यातील नेतृत्व म्हणून पाहत आहे. या संवाद यात्रेचा भव्यदिव्य समारोप सोहळा १ डिसेंबर रोजी होत आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांची उपस्थिती राहणार आहे . यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही तराळ यांनी केले.


दोन दिवसात सभासद नोंदणी करणार
तराळ यांनी सांगितले की, सभासद नोंदणी जिल्हा परीषद गटात सभासद नोंदणीचे काम दोन दिवसात पूर्ण करणार असून संपूर्ण मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सभासद नोंदणी करणारा अंतुर्ली जि.प.गट एक नंबर असेल, असा शब्द त्यांनी उपस्थित मान्यवरांना दिला.
ग्रामस्थांशी साधला संवाद
राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या ३६ व्या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री भोजना, धाबे पिंप्री, लोहारखेडा, पातोंडी, अंतुर्ली येथे माजी मंत्री एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधला.
यांची यात्रेप्रसंगी उपस्थिती
यावेळी यात्रा प्रमुख ईश्वर रहाणे, निवृत्ती पाटील, सोपान पाटील, प्रल्हाद बोडे, विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, नीळकंठ चौधरी, पवनराजे पाटील, विशाल महाराज खोले, दीपक पाटील, माजी सभापती सुधाकर पाटील, दशरथ कांडेलकर, विलास धायडे, राजेंद्र माळी, किशोर चौधरी, प्रदीप साळुंखे, रामदास पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांसह
अंतुर्ली, लोहारखेडा, पिंप्री भोजना येथील ग्रामस्थ उपस्थित होते.