सावद्यात गो रक्षकांवर हल्ला करणार्या नऊ आरोपींना बेड्या
हल्ल्याच्या निषेधार्थ शहरवासीयांनी पाळला कडकडीत बंद : जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी केली पाहणी
Nine accused who attacked cow guards in Savada, shackled सावदा : गुरांची वाहतूक करणारे वाहन रोखल्याच्या रागातून सावदा शहरातील गो रक्षकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची संतापजनक घटना सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर जमाव संतप्त झाल्याने शहरात तणावाचे वातावरण पसरले. खबरदारी म्हणून जिल्ह्यावरून कुमक बोलावून शहरात शांतता प्रस्थापीत करण्यात आली. या प्रकरणी जमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नऊ संशयीतांना अटक करण्यात आली आहे तर शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
गुरे वाहतूक रोखल्याने जमावाचा हल्ला
समजलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गुरांची वाहतूक करणारे वाहन स्वामीनारायण नगर ते साळीबागनजीकच्या कत्तलखाना परीसरात सावदा भाजपचे शहराध्यक्ष जे.के.भारंबे यांच्यासह पाच ते सहा जणांनी पकडल्यानंतर संतप्त जमावाने वाद निर्माण करीत तलवारीसह लोखंडी रॉड व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात भारंबे यांच्यासह तिघे जखमी झाले. या प्रकाराची वार्ता शहरात पसरताच मोठ्या प्रमाणावर जमाव जमला. दरम्यान, जखमींना फैजपूर शहरातील डॉ. शैलेश खाचणे व सावदा येथील व्ही.जे.वारके यांच्या दवाखान्यात उपचारार्थ हलवण्यात आले आहे.


जमावाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा
हल्ल्याबाबत जे.के.भारंबे यांच्या फिर्यादी सावदा पोलिसात संशयीत बिलाल कुरेशी, अशपाक कुरेशी, कादीर कुरेशी यांच्यासह 30 ते 4 संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सावदा शहरात फैजपूर, मुक्ताईनगर, यावल, रावेर, जळगाव, भुसावळ आदी ठिकाणाहून पोलिस कुमक मागवण्यात आली असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
अधीक्षकांची भेट : नऊ संशयीत ताब्यात
सावद्यातील तणावाचे वातावरण पाहता जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, डीवायएसपी कुणाल सोनवणे, भुसावळ पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी भेट देत पाहणी केली तसेच शांतता प्रस्थापीत केली. दरम्यान, सावदा पोलिसांनी या घटनेप्रकरणी नऊ संशयीत ताब्यात घेतले असून तपास सहा.निरीक्षक जालिंदर पळे व कर्मचारी करीत आहेत.
सावदा कडकडीत बंद : खासदारांची भेट
भाजपा पदाधिकार्यांसह गो रक्षकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी खासदार रक्षा खडसे यांनी शहराला भेट देत जखमींची विचारपूस केली तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सावदा पोलिसांना दिले. गो रक्षकांवर झालेल्या हल्ल्यानंतर सावदावासीयांनी स्वयंस्फूर्तीने मंगळवारी शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली. दरम्यान, खासदारांसोबत भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, राहुल महाजन, फैजपूर भाजपा शहराध्यक्ष अनंत नेहेते, ओबीसी मोर्चाचे जिल्हा सचिव भारती पाटील, ओबीसी शहराध्यक्ष राधाबाई परदेशी, महिला आघाडी तालुकाध्यक्षा रेखा बोंडे, जयश्री चौधरी, शहर उपाध्यक्ष उल्हास वाघुळे, रामा होले, राजाभाऊ चौधरी, दिनेश पाटील, रवींद्र चौधरी, शरद तायडे, मुस्ताक पिंजारी आदींची उपस्थिती होती.
