शिक्षक कवयित्री संध्या भोळे रचित ‘जावे गुंफित अक्षरे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन


भुसावळ : शहरातील तु.स.झोपे गुरूजी प्राथमिक विद्या मंदिरातील शिक्षिका तथा नवोदित कवयित्री संध्या भोळे रचित ‘जावे गुंफित अक्षरे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. खान्देशातील सुप्रसिद्ध साहित्यिक बाबासाहेब के. नारखेडे यांच्या कर्मभूमीत नवोदित कवयित्रीने आपल्या प्रतिभासंपन्नतेचे दर्शन घडवले असल्याचे मनोगतात मान्यवर म्हणाले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी खामगाव येथील प्रसिद्ध साहित्यीक प्रा. देवबा पाटील होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ येथील साहित्यीक सरवाकार प्राचार्य किसन वराडे, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, माजी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, मुख्याध्यापक सुनील वानखेडे, ललितकुमार भोळे व कवयित्री संध्या भोळे उपस्थित होत्या.



साहित्यीक वाटचालीला मान्यवरांच्या शुभेच्छा
प्रा.डॉ.जतीन मेढे म्हणाले की, बहिणाबाईंचे काव्य अजरामर झाल्यामुळे अनेक लेकी लिहू लागल्या आहेत. त्यांच्या सकस लेखनाचा परीरणाम नवोदित कवयित्री संध्या भोळे यांच्यावरही पडला असून त्यांच्या कवितांमधून हा वारसा जपला गेला आहे. परसाडे जि.प.शाळेच्या शिक्षिका कल्पना माळी यांनी संध्या भोळे यांच्या काव्य प्रवासाविषयी अनुभव व्यक्त करून नानाविध कर्तव्य पार पाडत त्यांनी आपली प्रतिभा जोपासण्याचे कार्य केले असल्याचे सांगितले. पी.व्ही.पाटील यांनी नवोदित कवयित्रीच्या शब्दरचनेचे कौतुक करून त्यांची काव्यरचना अप्रतिम असल्याचे सांगितले. किन्ही येथील सर्वोदय हायस्कूलचे माजी चेअरमन एकनाथ चौधरी यांनी बाबासाहेब के.नारखेडे यांचा साहित्यीक वारसा नवोदित कवयित्री संध्या भोळे जोपासत असल्याचे सांगून त्यांच्या साहित्यिक वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण जीवनाशी बांधिलकी
अंबरनाथ येथील प्राचार्य किसन वराडे म्हणाले की, अतिसंवेदनशील असणार्‍या नवोदित कवयित्री संध्या भोळे यांनी ग्रामीण जीवनाशी बांधिलकी जपली आहे. ग्रामीण व शहरी भागातील बदलते वास्तवही त्यांनी आपल्या कवितेतून मांडले आहे. बहिणाबाईंची लेक म्हणून आत्मभान जागृत करत आपल्या मातीशी प्रामाणिक राहत कवयित्रीने सकस लेखन सुरू केले आहे, ही गोष्ट लेवा गणबोली व एकूणच मराठी भाषेसाठी महत्त्वपूर्ण आहे. माणसातले माणूसपण हरवत चालण्याच्या काळात माणसातल्या चांगुलपणाला आवाहन करत ही कवयित्री शब्दधन पेरत चालली आहे.

पहिलाच काव्यसंग्रह सकारात्मक
अध्यक्षीय मनोगतात प्रा.देवबा पाटील म्हणाले की, शिक्षक म्हणून सातत्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणार्‍या संध्या भोळे यांनी सामाजिक जाणिवांचे भान राखून दर्जेदार शैलीत अभ्यासपूर्ण काव्यरचना केली आहे. ‘जावे गुंफित अक्षरे’ हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह सकारात्मक दिशेने वाटचाल करणारा असून त्यातून त्यांची वैचारिक परिपक्वता दिसून आहे. यावेळी उपस्थितांनी संध्या भोळे यांचा सत्कार करून त्यांना साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक सुनील वानखेडे यांनी सर्वांचे शाळेच्या वतीने स्वागत केले. तु. स. झोपे गुरुजी प्राथमिक विद्या मंदिराच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल भारंबे यांनी करीत आभारही मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !