दुचाकी लावण्याच्या कारणावरून यावलमध्ये दाम्पत्यास मारहाण : सहा आरोपींना अटक
यावल : घरासमोर दुचाकी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादात पती-पत्नीस लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात सहा संशयीतांविरूध्द दंगलीचा गुन्हा नोंदवण्यात आला. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. देशमुख वाड्यातील विजय कमलाकर देशमुख यांच्या घरासमोर रीतेश प्रभाकर देशमुख हे वारंवार दुचाकी लावत असल्याने त्याबाबतची तक्रार विजय देशमुख यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली असता त्याचा राग येवून गुरूवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रीतेश प्रभाकर देशमुख व प्रभाकर देशमुख यांनी लोखंडी रॉडने व काठीने विजय देशमुख व त्यांची पत्नी यांना मारहाण केली. अर्चना रीतेश देशमुख, अरुण भास्कर देशमुख, कल्पना अरुण देशमुख, राहुल अरुण देशमुख यांनीही मारहाण शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सहा संशयीतांविरूध्द येथील पोलिस ठाण्यात शिविगाळ करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे यासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. फौजदार सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे पुढील तपास करीत आहेत.
