सर्व धर्म, संस्कृतीचा अभिमान म्हणजे शिवबा !
कवी अनंत राऊत : अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे पुष्पांजली प्रबोधनमाला
भुसावळ : सर्व धर्म संस्कृतीचा अभिमान म्हणजे शिवबा हे आपल्याला समजून घ्यावे लागतील. महिलांच्या कुंडलीत शिक्षणाचा योग टाकला त्या सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची गावोगावी पारायणे झाली पाहिजे, असा सल्ला कवी अनंत राऊत यांनी दिला. भुसावळात अहिल्यादेवी कन्या विद्यालयात बुधवारी आयोजित अंतर्नाद प्रतिष्ठानच्या प्रबोधनमालेत ते बोलत होते. माजी खासदार कृषीमित्र सर्व्गीय हरीभाऊ जावळे व स्व.पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ही प्रबोधनमाला गेल्या पाच वर्षांपासून होत आहे. त्यात यंदा द्वितीय पुष्प अनंत राऊत यांनी गुंफले. ‘आनंदाचे शोधावे घर, दु:खाच्याही छाताडावर’ हा त्यांचा विषय होता.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी केले. विक्रांत चौधरी यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. अध्यक्षस्थानी अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष रघुनाथ सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे उद्योजक अजय बढे होते. विचारमंचावर प्रकल्पप्रमुख प्रसन्ना बोरोले, समन्वयक संजू भटकर, सहसमन्वयक ज्ञानेश्वर घुले हे होते. अमोल हरीभाऊ जावळे, दीपस्तंभचे यजुर्वेंद्र महाजन, इमेज क्रिएशन्स जळगावचे अमोल महाजन यांचे या प्रबोधनमालेसाठी मार्गदर्शन लाभले. कवी राऊत यांनी सलग सव्वादोन तास काळजाला भिडणार्या कविता सादर केल्या. त्यात ‘तुझ्या गावावरून गं’ या कवितेला प्रचंड दाद मिळाली. प्रबोधनमाला यशस्वीतेसाठी प्रदीप सोनवणे, योगेश इंगळे, अमित चौधरी, समाधान जाधव, कुंदन वायकोळे, देव सरकटे, प्रा.श्याम दुसाने, राजू वारके, भूषण झोपे, तेजेंद्र महाजन, राहुल भारंबे, जीवन सपकाळे, ललित महाजन, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील व सदस्यांनी परीश्रम घेतले.

मानवतावादी विचारांची पेरणी करा
जाती-पातीच्या संघर्षात माणुसकीचा गळा दाबला जाऊ नये ही भावना दृढ झाली पाहिजे. त्यासाठी संत, महापुरुषांनी माणूस केंद्रस्थानी ठेवून मानवाच्या कल्याणाची विचारधारा सांगितली आहे. ती अस्तित्वात आणि आचरणात यायला हवी. तत्वांना सुद्धा विचारांच्या आणि ज्ञानाच्या अग्नित झोकून दिलं पाहिजे. जे उजळून निघेल त्याचा आम्ही सोनं म्हणून विचार करायला हवा आणि बाकीचे फेकून दिले पाहिजे हा बाबासाहेबांचा विचार सदैव स्मरणात ठेवावा. सगळेच संत आणि समाजसुधारकांची परंपरा जनकल्याणाच्या एका धाग्यात गुंफलेली आढळते. म्हणून गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम महाराज यांना समजून घ्यायचं असेल तर माणूस केंद्रस्थानी ठेवला पाहिजे, असा सल्ला अनंत राऊत यांनी दिला.
कसं जगावं हे शिवरायांनी शिकवलं
कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी तर मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराज यांनी शिकवलं पण दुर्दैव हे की शिवछत्रपतींचे विचार आजही तळागाळापर्यंत रुजलेले नाहीत. कपाळावर टिळा लावला, दाढी कोरली, चंदन लावले की शिवाजी महाराजांचा मावळा होता येत नाही. त्यांचे विचार जोपर्यंत अंतरंगात भिनणार नाहीत तोपर्यंत आपल्यामध्ये छत्रपतींचा मावळा निर्माण होणार नाही. सर्व धर्म संस्कृतीचा अभिमान म्हणजे शिवबा हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. महिलांच्या कुंडलीत शिक्षणाचा योग टाकला त्या सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची गावोगावी पारायणे झाली पाहिजे. स्त्री-पुरुष समानता केवळ कागदावर, भाषणात बोलून चालणार नाही. ती कृतीतून यावी लागेल, असेही राऊत म्हणाले.