जामनेर तालुका खुनाने हादला : मारहाणीत वीटभट्टीवरील तरुण मजुराचा मृत्यू

वीटभट्टी मालकाविरोधात पहूर पोलिसात खुनाचा गुन्हा : दाम्पत्यातील भांडण बेतले जीवावर


Jamner taluka hit by murder : A young laborer at a brick kiln was beaten to death जामनेर : दाम्पत्याच्या भांडणात मध्यस्थी करणार्‍या वीट भट्टी मालकाने तरुणाच्या डोक्यात जोरदार काठी मारल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना जामनेर तालुक्यातील ढालशिंगी येथे गुरुवारी सायंकाळी सात वाजता घडली. या घटनेत लहानू चाँदखा तडवी (भिल, 25, रा.गोद्री, ता.जामनेर) असे मयताचे नाव असून हर्षल भरत पवार (33, चांभार, ढालसिंगी, ता.जामनेर) याच्याविरोधात पहूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दाम्पत्याच्या भांडणातील मध्यस्थी बेतली जीवावर
मयत लहानू चांदखा तडवी (25) हा तरुण त्याची पत्नी व मुलाबाळांसह तोंडापूर ते ढालसिंगी दरम्यान संशयीत हर्षल भारत पवार यांच्या वीट भट्टीवर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. गुरुवार, 15 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास लहानू तडवी याचे पत्नीशी भांडण सुरू असताना संशयीत हर्षल पवार याने पत्नीशी भांडण का करतो? म्हणत जाब विचारला व हातातील काठीने तडवी याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी शाहरूख रशीद तडवी (26, गोद्री, ता.जामनेर) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी हर्षल पवार विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहेत.



पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न
आरोपी तथा वीट भट्टी मालक हर्षल पवार याने तडवी या तरुणाचा खून केल्याने मृतदेह जागेवरून हलवत पुरावादेखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला तसेच लिंबाच्या झाडाजवळ टाकले व भट्टी जवळील खाटेवर मृतदेह आणून सोडत प्रथमदर्शनी नैसर्गिक मृत्यू झाला, असे भासविण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी धाव घेतल्यानंतर खून झाल्याचे स्पष्ट झाले. पहूर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !