सम्मेद शिखरजी तीर्थस्थळाला पर्यटनक्षेत्राच्या दर्जामुळे पावित्र्य धोक्यात
भारतीय शाकाहार संघाचे जिल्हाध्यक्ष चेतन जैन यांचे राष्ट्रपतींना पत्र
भुसावळ : जगात सर्वात पवित्र असलेले जैन धर्मांचे तीर्थस्थळ सिद्ध क्षेत्र श्री पारसनाथ पर्वतराज, सम्मेद शिखरजी, मधुबन, जि.गिरडह (झारखंड) हे धर्मस्थळ असताना पर्यावरण मंत्रालयाने स्थळाला पर्यटनस्थळ घोषित केले आहे. पर्यटन मंत्रालय आणि झारखंड सरकारकडून श्री संमेद शिखरजी तीर्थक्षेत्र या ठिकाणी इको टुरीझम, लघूउद्योग, मांस उद्योग, मत्स्य पालन, मुर्गी पालन, भूजलचे औद्योगिक निष्कर्षन, हॉटेल व रीसॉट ची परवानगी, कमर्शियल कन्स्ट्रक्शन आणि इतर बरेच काही गतिविधिच्या हालचाली सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याने धर्मस्थळाचे पावित्र्य नष्ट होण्याची भीती भुसावळातील भारतीय शाकाहार संघाचे जिल्हाध्यक्ष चेतन जैन यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी राष्ट्रपतींकडे ऑनलाई लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
अत्यंत चुकीचा निर्णय
धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्यामुळे जगातील जैन समाजामध्ये व धर्म प्रेमींमध्ये तसेच स्थानिक नागरीकांमध्ये आक्रोश पसरला आहे. सर्वधर्म प्रेमी या ठिकाणी दर्शन घेताना तीर्थक्षेत्राचे पावित्र्य लक्षात घेऊन नग्न पायाने पूर्ण पर्वतराजची परीक्रमा-वंदना करतात तसेच अन्न-जल त्याग करून दर्शन घेतात, पूजा प्रार्थना करतात मात्र पर्यटनस्थळाच्या दर्जामुळे या धर्मस्थळाचे पावित्र्य धोक्यात येणार आहे. महामहीम राष्ट्रपतींनी केंद्र सरकार व झारखंड सरकारला योग्य निर्णय व संशोधन करण्या करीता आदेश द्यावेत, अशी मागणी भुसावळातील चेतन जैन यांनी केली आहे.
