दीपनगरच्या राखेमुळे जलस्त्रोत दूषित : शिवसेनेने थोपटले दंड
भुसावळ : गेल्या 20 वर्षांपासून भुसावळ दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पातून निर्माण होणारी राख ही वेल्हाळे परीसरात पाईपलाईन मार्फत अॅश बंडात सोडली जात असलीतरी पाईपलाईन अति दाबामुळे फुटल्याने वेल्हाळे परीसरातील नद्या, नाले व तलावात मोठ्या प्रमाणावर राखेचे प्रदूषण होऊन जल स्तोस्त्र दूषित झाले आहे. दरम्यान, या संदर्भात तक्रारी केल्यानंतरही दखल घेण्यात न आल्याने शिवसैनिकांनी राख वाहून नेणार्या पाईपलाईन पेडेस्टलचे काम बंद पाडले. काम बंद झाल्याची सूचना मिळताच दीपनगर प्रकल्प मुख्य अभियंता विवेक रोकडे व अधिकार्यांनी शिवसेना पदाधिकार्यासोबत परीसराची पाहणी केली.
पाईप लाईन बंदचा दिला होता इशारा
संयुक्त प्रदूषण संघर्ष समिती वेल्हाळे, जाडगाव, मन्यारखेडे, पिंप्रीसेकम व आदी जनता मच्छिमार सोसायटी तसेच गावातील नागरीकांमार्फत 009 पासून मोठ्या प्रमाणावर आंदोलन होऊन सुद्धा दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या प्रशासनाने होणार्या प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावलेला नाही व शासनाच्या प्रदूषणाबाबत नियम व अटींचे कोणत्याही प्रकारचे पालन किंवा त्यासाठी त्यांच्या पर्यावरण विभाग व स्थापत्य विभागामार्फत कोणत्याही कायमस्वररूपी उपाय योजना केलेल्या नाहीत. भविष्यात ही नियोजन करण्याचा आराखडा तयार नसल्याने होऊ घातलेल्या नवीन 660 प्रकल्पाच्या वेल्हाळा तलाव ते अश बंड क्रमांक तीनपर्यंत राख वाहून नेणार्या पाईपलाईनचे काम बंद करण्याचा इशारा 17 जून 2022 रोजी शिवसेनेतर्फे देण्यात आला होता.

प्रकल्प अधिकार्यांनी केली पाहणी
वारंवार सूचना देऊनही प्रदूषण निर्मूलनासाठी कोणत्याच प्रकारची कार्यवाही दीपनगर प्रशासनाने केली नाही, राखेपासून होणार्या प्रदूषणाकडे डोळेझाक केली जात आहे. वेल्हाळे परिसरातील नैसर्गिक साधन संपत्तीचा नष्ट होत असून, नागरिक आरोग्यविषयक समस्येने त्रस्त आहे म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे तालुकाप्रमुख संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश महाजन, माजी उपजिल्हा संघटक विलास मुळे व शिवसैनिकांनी राख वाहून नेणार्या पाईपलाईन पेडेस्टलचे काम बंद पाडले. काम बंद झाल्याची सूचना मिळताच दीपनगर प्रकल्प मुख्य अभियंता विवेक रोकडे व अधिकार्यांनी शिवसेना पदाधिकार्यासोबत परिसराची पाहणी केली.
आधी उपाययोजना नंतरच काम
नागरीकांना प्रदूषणापासून होणार्या त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठी कायस्वरूपाच्या उपाययोजना करण्यात याव्यात नंतरच 660 प्रकल्पाच्या कामाची सुरुवात करावी अन्यथा कोणत्याही प्रकारचे 660 प्रकल्पाचे काम परीसरात होऊ दिले जाणार नाही, असा इशारा संतोष सोनवणे यांनी याप्रसंगी दिला.