पी.एम.किसानचे अनुदान विचारण्यासाठी तहसीलमध्ये अनेकांची पायपीट
यावल : गेल्या काही महिन्यांपासून यावल तालुयातील अनेक शेतकर्यांचे पीएम किसानचे अनुदान हे रेंगाळले आहे. पूर्वी मिळणारे अनुदान अचानक बंद झाल्यामुळे शेतकरी वर्ग पुरता हैराण झाला आहे व दर शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग यावलला येऊन तहसील कार्यालयाची पायपीट करीत आहे. कधी मिळणार अनुदान हा एकच प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
अनुदानापासून शेतकरी वंचित
यावल तालुयातील असंख्य शेतकर्यांचे पीएम किसानचे अनुदान अचानक बंद पडले आहे. या संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी शुक्रवारी यावल तहसील कार्यालयामध्ये तालुयातील शेतकरी दर आठवड्याला पायपीट करून येत आहेत व संबंधित विभागाच्या लिपिकाकडे या संदर्भातील माहिती जाणून घेत आहे. अनेक जणांना यापूर्वी अनुदान मिळाले आहे. मात्र आता अचानक बंद झाले आहे तेव्हा पुर्वी मिळणारे अनुदान का बंद झाले हे मात्र स्पष्ट झालेले नाहीये म्हणून ई केवायसी आहे किंवा नाही, काही त्रृटी आहे किंवा काय, याची विचारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वयोवृध्द शेतकरी तहसील कार्यालयाच्या फेर्या मारतांना दिसत आहे. या संदर्भातील उत्तर तहसील कार्यालयामध्ये देखील नाही. कारण पीएम किसान अनुदान वितरणची प्रक्रिया वेगळी असून तहसील कार्यालयामध्ये पीएम किसानच्या संकेतस्थळावर केवळ संबंधित इसमाचे नाव नोंद आहे किंवा कसे व ई केवायसी झाली आहे किंवा नाही याचीच माहिती दिली जात आहे. प्रशासनाने अनुदान संदर्भातील अडचणी दूर कराव्या, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

