आदिवासी ठाकूर समाजाला व्हॅलेडीटी मिळविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार : आमदार संजय सावकारे

भुसावळात आदिवासी ठाकूर समाजाचा मेळावा : 213 उपवर-वधूंनी मेळाव्यात दिला परीचय ः आजी-माजी आमदार प्रथमच एकाच व्यासपीठावर


भुसावळ : शहरातील शिवपूर कन्हाळा रोडवरील मोरया मंगल कार्यालयात रविवारी ठाकूर समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा झाला. मेळाव्यात 213 उपवर-वधूंनी परीचय दिला. विशेष म्हणजे आजी-माजी आमदार गेल्या अनेक वर्षानंतर प्रथमच एकाच व्यासपीठावर दिसून आले मात्र दोघांमध्ये संभाषण झाले नाही. दरम्यान, समाजाने संघटीत होऊन लढा द्यावा, आदिवासी ठाकूर समाजाला व्हॅलेडीटी मिळविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करीत असून आपल्याकडील पुरावा गोळा करून नोटस् माझ्याकडे द्याव्यात ते सभागृहात मांडता येतील, असे आमदार संजय सावकारे म्हणाले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य आदिवासी ठाकूर समाजाचे अध्यक्ष डॉ.जितेंद्र युवराज ठाकूर होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय सावकारे, माजी आमदार संतोष चौधरी, माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी तसेच जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे व्हा.चेअरमन विरेंद्र भोईटे, सचिव रणजीत शिंदे, कार्याध्यक्ष चंद्रकांत सैंदाणे, शीतल जितेंद्र ठाकूर, प्रताप सूर्यवंशी, जळगाव जिल्हाध्यक्ष गोपाळ ठाकूर, तालुकाध्यक्ष हिंमत ठाकूर, माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर तसेच युवा अध्यक्ष प्रशांत ठाकूर (बंटी) होते. सूत्रसंचालन रमाकांत ठाकूर, किरण ठाकूर, सुनील ठाकूर, अपेक्षा पवार यांनी केले.

वधू-वरांनी दिला परीचय
आदिवासी ठाकूर समाजातर्फे आयोजीत केलेल्या या वधू-वर पालक परीचय मेळाव्यास राज्यभरातून वधू-वर व त्यांच्या पालकांची उपस्थित होती. यात 71 मुली व 141 मुलांनी त्यांचा परीचय दिला. मेळाव्यास राज्यातील जळगाव, धुळे, नाशिक, मुंबई, पुणे, नंदूरबार आदी ठिकाणाहून समाजबांधव उपस्थित होते.

एकत्र येवून द्यावा लढा : मान्यवरांचा सूर
मेळाव्यात माजी आमदार संतोष चौधरी, समाजाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र ठाकूर आदी समाजबांधवांनी मनोगत व्यक्त केले. यात समाजाने एकत्र येऊन लढा द्यावा, असे आवाहन करण्यात आले. जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, समाजातील मुले, मुली या उच्च शिक्षण घेत आहेत, मात्र घटस्फोटाचे प्रमाण सुध्दा वाढू लागले आहे ही चिंतनीय बाब आहे. यामुळे मुलीच्या आईने मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये, मुलीचा संसार चांगला होऊ द्यावा, असे ठाकूर म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !