पोलिस पाटलांच्या प्रलंबित प्रश्नांकडे वेधले नाथाभाऊंनी लक्ष
Nathabhau drew attention to the pending questions of the Police Patels मुक्ताईनगर : आमदर एकनाथराव खडसे यांनी महाराष्ट्र विधानपरिषद नियम 96 अन्वये विधानपरीषद सभागृहात राज्यातील पोलीस पाटलांच्या समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. सुचना मांडताना ते म्हणाले की, पोलिस पाटील हे प्रशासन व ग्रामसंस्थामधील अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून ग्रामीण भागात काम पाहतात. राज्यांवर आपत्कालीन संकटे आली त्या संकटात राज्यातील पोलिस पाटलांनी त्या संकटाचा धैर्याने सामना केला. राज्यात कोरोनाने भयंकर रूप धारण केले असताना पोलिस पाटलांनी आपल्या जीवाची पर्वा न करता संकटात सापडलेल्या रुग्णाची सेवा केली. गावात शांतता प्रस्थापीत करणारा पोलिस पाटील उपेक्षित जीवन जगत आहे, पोलिस पाटलांच्या मागण्या शासनाकडे बर्याच वर्षापासून प्रलंबित असून या मागण्यासाठी राज्यातील पोलीस पाटलांनी अनेक वेळा उपोषण धरणे आंदोलन करून शासनाकडे मागण्यांचे निवेदन दिले परंतु शासनाचे त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष झाले आहे.
मानधनात केली वाढ : गृहमंत्री
उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिस पाटील यांचे मानधनात रुपये तीन हजारांवरून साडेसहा हजार करण्यात आले आहे. कोव्हिड -19 संबंधित कर्तव्य बजावताना कोव्हिडमुळे मयत झालेल्या राज्यातील 25 पोलिस पाटील यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यात आले आहे . केंद्र शासनाचा किमान वेतन अधिनियम 1948 अंतर्गत येणार्या 67 अनुचित उद्योगातील कार्यरत कामगार वर्गात किमान वेतन कायदा लागू असून पोलीस पाटील हे पद मानसेवी शासकीय कर्मचारी या वर्गात मोडत असल्याने त्यांना सदर कायद्यान्वये किमान वेतन देय ठरत नाही. पोलीस पाटलांच्या वारसांना पोलीस पाटील भरतीमध्ये प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
