ऐतीहासिक फैजपूर नगरीत रंगले तिसरे लेवा गणबोली साहित्य संमेलन

बोलीभाषेकडे डोळ्यास नजरेने पाहणे गरजेचे : आमदार शिरीष चौधरी


फैजपूर : भाषा संवर्धन आणि जतन एका विशिष्ट बोलीसाठी अत्यंत महत्त्वाचे असून जोपर्यंत आपल्या बोलीत बोलण्याची सवय आपण लावून घेत नाही तोपर्यंत भाषेचे संवर्धन आणि ती टिकून ठेवण्याचे कार्य अपूर्णच राहील म्हणून प्रत्येक व्यक्तीने बोलीभाषेकडे डोळ्यास नजरेने पाहणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत आमदार शिरीष चौधरी यांनी येथे व्यक्त केले. स्व.कुसुमताई चौधरी साहित्य नगरी, फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी स्व.कुसुमताई चौधरी यांच्या स्मृतीदिनानिमित्त लेवा गणबोली साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आमदार चौधरी बोलत होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नाट्यछटाकार आणि प्रवर्तक लेवा गणबोली संवर्धन डॉ.अरविंद नारखेडे अध्यक्षस्थानी होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
उद्घाटक म्हणून प्रसिद्ध भाषा संशोधक डॉ.काशीनाथ बर्‍हाटे (अचलपूर) होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक रत्नाकर चौधरी, उद्योजक सुबोध चौधरी, जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे, प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी, नवनियुक्त अधिसभा सदस्य एकनाथ नेहते, प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ.किशोर कोल्हे, डॉ.पद्माकर पाटील, धनंजय चौधरी, प्रा.एस. के.चौधरी, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रभात चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.



नव्या पिढीने वाचनाची लावावी सवय
आमदार चौधरी म्हणाले की, नवीन पिढीने वाचनाची सवय लावावी तसेच बोली भाषेत साहित्य निर्मिती करावी तरच भाषेचे जतन होईल. स्व. कुसुमताई चौधरी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ 50 हजार रुपयाचे बक्षीस लेवा गणबोलीच्याा विकासासाठी प्रयत्न करणार्‍या साहित्यिक अथवा कलावंतांना प्रेरणा म्हणून घोषित केले. काशीनाथ चौधरी यांनीही आपल्या भाषणात बोली भाषेचे महत्व पटवून दिले तसेच प्रशासकीय क्षेत्रात काम करणार्‍या सर्व मंडळींना शासन दरबारी लेवा गणबोलीचे महत्व वाढण्यासाठी साहित्य विकास मंडळाची आवश्यकता असल्याचे नमूद केले.

देवागण बोली भाषेचा विकासासाठी करावी आखणी
उद्योजक रत्नाकर चौधरी यांनीही भाषेच्या तांत्रिक बाबींमध्ये लक्ष केंद्रित करून लिखाणासोबतच त्याचे डॉक्युमेंटेशन आणि चित्रीकरण या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले तसेच पुढील काळात समाजात वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य निर्माण करणार्‍या साहित्यीक यांना आमंत्रीत करून देवागणबोली भाषेत साहित्यिक विकासाचा आराखडा तयार करावा आणि जागतिक स्तरावरील विचारांचे अनुवाद करून देवागण बोली भाषेचा विकास होईल या दृष्टीने आखणी करण्याचे आवाहन केले.

ही तर खेदजनक बाब
अरविंद नारखेडे म्हणाले की, प्रमाण भाषेत एखादा शब्द बोली भाषेचा आढळल्यावर ज्याप्रमाणे त्या शब्दांना कमी लेखून हिणविले जाते ही प्रवृत्ती बोलीभाषांसाठी खूप मारक आहे. अशा प्रकारच्या प्रवृत्तींना बोली भाषेतील साहित्यिकांनी आपल्या कार्यातून विविध प्रकारच्या साहित्यिक रचनेतून दाखवून दिले पाहिजे की बोलीभाषा ही खर्‍या अर्थाने साहित्यकारांची भाषा आहे कारण बोली भाषेतले साहित्य हे त्या-त्या समाजाच्या जाणीवांचे त्या-त्या परीसरातील ग्रामीण जीवनाचे प्रत्यक्ष दर्शन करणारे साहित्य आहे म्हणून देवागणबोली साहित्य संमेलनाच्या माध्यमातून बोली भाषेतून साहित्य निर्माण करण्याचा संकल्प करणे आवश्यक असून भविष्यात लेवा गणबोलीला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

कलावंतांचा केला सन्मान
प्रसंगी लेवा गणबोलीच्या विकासासाठी सतत प्रयत्न करणार्‍या अनेक कलावंत लेखक यांचा सन्मान करण्यात आला. त्यात प्रतिभा ढाके, उत्पल चौधरी, निवृत्ती नेरी, हरीभाऊ कोडे, शिवम चौधरी, रवी वारके, भूषण ढाके, राजेंद्र जावळे, अभिनव टोंगळे, विठ्ठल भंगाळे, अजय चौधरी, विजय पाटील, अ.सू.पाटील, शीतल पाटील, सुनील इंगळे इत्यादी विविध क्षेत्रातील कलावंतांचा सन्मान करण्यात आला. मानाचे पान या सदरात प्रतिष्ठित व्यक्तींच्या सन्मानविषयक मानाचे तसेच आमदार चौधरी यांच्या विषयी मानाचे पानाचे वाचन ज्योती राणे यांनी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद नारखेडे यांच्या मानाचे पानाचे वाचन सुवर्णालता पाटील तसेच अ.सू.पाटील यांच्या मानाच्या पानाचे वाचन कार्यक्रमाचे संयोजक तुषार वाघुळदे यांनी केले.

विविध पुरस्कारांची घोषणा
प्रसंगी मान्यवरांनी कलावंतांसाठी भविष्यात दिल्या जाणार्‍या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात शरयू प्रभाकर पाटील पुरस्कार, कमल कृष्ण नारखेडे पुरस्कार, कृष्णा मोहन नारखेडे पुरस्कार, कवयित्री कुसुमताई चौधरी पुरस्कार हे सर्व पुरस्कार 22 एप्रिल रोजी लेवागणबोली दिवस साजरा करत असताना त्यादिवशी दिले जातील, असे अध्यक्षांच्या वतीने घोषित करण्यात आले. प्रास्ताविक जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व लेवा गणबोली साहित्य मंडळाचे सचिव प्रभात चौधरी यांनी केले तर पाहुण्यांचा परीचय ज्योती राणे यांनी करून दिला. सूत्रसंचलन सुवर्णलता पाटील व ज्योती राणे यांनी केले तसेच आभार प्रा.संध्या पाटील यांनी मानले.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
संमेलनाच्या यशस्वी आयोजनासठी संयोजक तुषार वाघुळदे, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रभात चौधरी, शारदा चौधरी, कमल पाटील, राजेंद्र पाटील, संजय पाटील, शकुंतला चव्हाण, शोभा नापडे, गिरीश नारखेडे, अजय चौधरी, सुनील खडके, प्रमोद महाजन, अ‍ॅड.रजनीश राणे, दीपक चौधरी, विनय पाटील, विना नारखेडे, संध्या महाजन, लिलाधर कोल्हे, किशोरी वाघुळदे आीदंनी परीश्रम घेतले. साधना लोखंडे यांनी पसायदान म्हटले. नंतरच्या सत्रात अध्यक्षस्थानी प्रा.जतीनकुमार मेढे, प्रा.संजीव सोनवणी, प्रा.कमल पाटील आणि साहित्य सादर करताना लेवा गणबोली उपासक डॉ.शोभा नाफडे, प्रा.संध्या महाजन मंचावर उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !