तांदलवाडी-बलवाडी पुलावर अपघाताची भीती
खिर्डी : तांदलवाडी-बलवाडी रस्त्यावरील दोन पुलांचे काम गेले तीन ते चार महिन्यानंतरही पूर्ण झालेले नाही शिवाय दोन्ही पुलांच्या दोन्ही बाजूला मातीचे भराव टाकण्यात आले असून कामाच्या दर्ज्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अपघातापूर्वीच घ्यावी दखल
दोन्ही पुलांच्या दोन्ही बाजूंचे भरावाचे काम करतांना योग्य खबरदारी घेतली घेतली न गेल्याने अपघात होण्याची भीती वर्तवली जात आहे. तांदलवाडी बलवाडी हा परीसर केळीसाठी प्रसिद्ध असून त्यामुळे केळी भरण्यासाठी ट्रक ट्रॅक्टरसारख्या अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. शिवाय निंभोरा, खिर्डी, ऐनपूरसह रावेरला ग्रामीण भागातील नागरीकांची ये-जा करण्याचा मुख्य रस्ता असून येथून जा-ये करतांना किरकोळ स्वरूपाचे अपघात सुध्दा घडलेले आहेत. भरावाची मातीही दोन्ही बाजूने खचत असून मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापूर्वी उपाययोजना करावी तसेच या सर्व प्रकाराकडे अधिकारी, ठेकेदाराने कानाडोळा केल्याचा आरोपही ग्रामस्थ करीत आहेत.


