राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण मी सोडवला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
I redeemed the bow and arrow mortgaged to NCP : Chief Minister Eknath Shinde मुंबई : भारतीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवण शिंदे गटाला धनुष्यबाणासह शिवसेना नाव देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, या निकालामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अजूनही तुम्हाला सुधारण करण्याची संधी आहे. 2019 मध्ये यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे धनुष्यबाण गहाण ठेवला होता तो मी आज सोडवल्याचेही ते म्हणाले.
बहुमत आमच्याकडेच
50 आमदार व 13 खासदार, हजारो नगरसेवक, कार्यकर्ते आमच्याकडे असल्याने मेरीट पाहूनच हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. मेरीटवरील निर्णय आम्हाला अपेक्षित होता. लोकशाहीत बहुमताला महत्व आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विचारांचा हा विचार आहे. जे कोण आज बोलतायत त्यांनी 2019 ला बाळासाहेबांचे विचार कोणाच्यातरी दावणीला बांधले. त्यांचे विचार विकण्याचं मोठं पाप केलं. त्यांना ही मोठी चपराक असल्याचे ते म्हणाले.




दुटप्पी भूमिका निकालाने दाखवून दिली
जेव्हा त्यांच्या बाजूनं निकाल लागतात तेव्हा न्यायव्यवस्था बरोबर असते. जेव्हा विरोधात निर्णय लागतो तेव्हा दबावाखाली निर्णय घेतला, न्यायव्यवस्था विकली गेली असं म्हटलं जातं. ही दुटप्पी भूमिका घेतायत त्यांना त्यांची जागा निकालानं दाखवून दिली. यापुढेही बाळासाहेबांची भूमिका विचार पुढे नेणार आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी यापूर्वीच घनुष्यबाण गोठवलं जाईल असं म्हटलं होतं. परंतु 2019 ला काँग्रेस राष्ट्रवादीकडे जो धनुष्यबाण गहाण ठेवला होता तो मी आता सोडवला आहे, असंही ते म्हणाले.
हा महाराष्ट्र धु्रतराष्ट्रांचा नाही : उद्धव ठाकरे
रामाकडे, रावणाकडे धनुष्यबाण होता. पण विजय रामाचा झाला. सत्याचा विजय नेहमी होत आला आहे. अन्यायाविरोधात जे पेटून उठलेत त्यांचा विजय होईल. हा अत्याचार लोकशाहीवर होतोय. हा छत्रपतींचा महाराष्ट्र, धुतराष्ट्राचा नाही. या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. अपात्रतेबाबत घटनातज्ञांनुसार सदस्यांचे अपात्र होऊ शकतात. हा ठरवलेला कट आहे का? धनुष्यबाण ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केला तरी ओरबाडून घेऊ शकत नाही. नामर्द कितीही माजला तरी तो मर्द होत नाही अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर केली.