शेगावसह नांदूरा व मलकापूर रेल्वे स्थानकांचा होणार विकास
Nandura and Malkapur railway stations along with Shegaon will be developed भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील 35 रेल्वे स्थानकांवर अमृत भारत योजने अंतर्गत नव्याने विकास कामे केली जाणार आहे. प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी 35 स्थानकांवर नव्याने कामे केली जाणार असून या अनुषंगाने विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.एस.केडिया, गति शक्ती युनिटचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक नवीन पाटील व इतर अधिकार्यांनी सोमवारी अमृत भारत योजनेअंतर्गत शेगांव, नांदूरा व मलकापुर या स्थानकांची पाहणी केली.
विविध सुविधांबाबत केले प्लॅनिंग
शेगाव स्थानकावर होमलैंड प्लेटफार्म, तिसर्या व चौथ्या लाईनचे प्लॅनिंग, प्रवाशाला दुचाकी व चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था, पाथवे, स्थानकावरील शेड, प्रतीक्षालय, आराम कक्ष, पादचारी पूल, लिफ्ट, सरकता जीना, गार्डन याची पाहणी व कश्या प्रकारे प्लानिंग असेल याबाबत माहिती देण्यात आली. नांदुरा स्टेशनवर पार्किंग, ड्रॉप एण्ड गो एरीया, लिफ्ट, पादचारी जीना, शेड व इतर प्रवासी सुविधा तसेच मलकापुर स्टेशनवर तिसरी आणि चौथी लाईन, बुकिंग ऑफिस, पार्किंग, येनेसाठी व जान्यासाठी प्रवेशद्वार माल गोदामासाठी स्वतंत्र रस्त्याचे प्लानिंग करण्यात आले व इतर प्रवासी सुविधांवर चर्चा करण्यात आली. या निरीक्षण दरम्यान वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ.शिवराज मानसपुरे, वरीष्ठ विभागीय विद्युत अभियंता पालटा सिंग, वरीष्ठ विभागीय सिग्नल व दूरसंचार अभियंता विजय कांची, डेप्युटी मुख्य अभियंता निर्माण पंकज धावरे, विभागीय सुरक्षा आयुक्त श्रीनिवास राव व मंडल अभियंता शुक्ला, सहायक सुरक्षा आधिकारी सोनवणे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

