भुसावळातील खून प्रकरणात पोलिसांनी अॅट्रासिटीचे कलम वाढवले : संशयीतांना 12 पर्यंत पोलीस कोठडी
मयत तरुणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार : तिसर्या संशयीताचा पोलिसांकडून कसून शोध
भुसावळ (शनिवार, 10 ऑक्टोबर 2026) : उसनवारीचे 29 लाख रुपये परत न केल्याच्या वादातून शहरातील गोपाळ नगरातील 21 वर्षीय भूषण उल्हास व्हावळे या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी संजय दत्तू आवटे व प्रमोद बलराम लाहोरीया (दोन्ही रा.भुसावळ) यांना पसार होण्यापूर्वीच अटक केली होती. संशयीताना शुक्रवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची अर्थात 12 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, खुनातील मयत भूषण व्हावळे या तरुणावर शोकाकुल वातावरणात शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी अॅट्रासिटीचे कलम वाढवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
फार्म हाऊसवर बोलावून खुनाचा आरोप
भुसावळातील भूषण उल्हास व्हावळे (21) या तरुणाने उसनवार 34 लाख रुपये घेतल्यानंतर पाच लाख रुपये परत केले मात्र उर्वरीत 29 लाख रुपये परत न दिल्याच्या वादातून संशयीत आरोपींनी साक्री फाटा परिसरातील संजय दत्तू आवटे यांच्या फार्म हाऊसवर नेत त्याला बेदम मारहाण केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताचा भाऊ विशाल उल्हास व्हावळे यांनी करीत भुसावळ बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर संजय दत्तू आवटे, प्रमोद बलराम लाहोरीया (दोन्ही रा.भुसावळ), रफिक मेमन उर्फ गुड्डू विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला व आवटे व लाहोरीया यांना गुरुवारी दुपारी अटक करण्यात आली होती. संशयीत गुड्डू अद्यापही पसार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आरोपींविरोधात अॅट्रासिटीचे कलम वाढवले
मयत तरुण हा अनुसूचित जाती-जमातीचा असल्याने खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी अॅट्रासिटीचे कलम वाढवले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात आरोपींना भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात न्यायमूर्ती सी.व्ही.पाटील यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता 12 पर्यंत (तीन दिवस) पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संशयीत प्रमोद बलराम लाहोरीया याची ओळख परेड बाकी असल्याने काळा गाऊन घालून त्यास हजर करण्यात आले तर संजय आवटे याची ओळख पटली असल्याने त्यास साध्या कपड्यांवरच न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलिसांनी मागितली चार दिवसांची पोलीस कोठडी
अॅट्रासिटी कलमामुळे तपास पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्याकडे आल्याने ते स्वतः अतिरीक्त सत्र न्यायालयात उपस्थित होते. पोलिसांतर्फे बाजू मांडताना त्यांनी सांगितले की, आरोपींनी फार्म हाऊसवर खून करून मृतदेह वॉटर पार्कजवळ टाकण्यासाठी कुठल्यातरी वाहनाचा वापर केला असून त्याचा तपास करायचा आहे शिवाय लाकडी दांड्यासह कुठल्यातरी शस्त्राने मारहाण केली असून उसनवार दिलेल्या पैशांव्यतिरीक्त आणखी कुठल्या कारणाने हा खून करण्यात आला तसेच अन्य आणखी कोण आरोपी या कृत्यात सहभागी आहेत याचा सखोल तपास करायचा असल्याने त्यासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सरकार पक्षातर्फे अॅड.मोहन देशपांडे यांनी प्रभावी युक्तीवाद केला तर संशयीतातर्फे अॅड.मनीष सेवलानी यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
संशयीत भाजपा पदाधिकार्याचा बंधू
खून अटकेतील संशयीत संजय आवटे हे भुसावळातील भाजपा नगरसेवक राजेंद्र आवटे यांचे बंधू तर माजी शिक्षण सभापती मंगला आवटे यांचे पती असल्यान खून प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे.


