सलग चौथ्या दिवशी संप कायम : भुसावळात महिला कर्मचार्यांनी सांभाळली आंदोलनाची कमान
आरोग्य यंत्रणा कोलमडली, शाळांना अघोषित सुटी
Strike continues for fourth consecutive day : Health system collapses, unannounced holidays for schools भुसावळ : स्वाभिमानाने जगण्यासाठी व कुणापुढेही उतारवयात हात न पसरण्यासाठी जुनी पेन्शन योजना हाच एकमेव पर्याय असून योजना जो पर्यंत लागू होत नाही तो पर्यंत संप कायम राहिल, असा निर्धार भुसावळातील संपकर्यांनी व्यक्त केला आहे. सलग चौथ्या दिवशी संप सुरू असल्याने शाळांना अघोषित सुटी जाहीर झाली असून शासकीय कार्यालयांमध्येही कामे ठप्प झाली आहेत. विद्यार्थ्यांना विविधांगी दाखल्यांचे वाटप थांबले असून शेतकर्यांचेदेखील सातबारा उतारे मिळवण्यासाठी मोठे हाल होत आहेत.
भुसावळात चौथ्या दिवशीही कामकाज ठप्प
भुसावळ : जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचा निर्धार भुसावळातील कर्मचार्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी शासकीय व निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचा संप सुरू आहे. शुक्रवार, 17 रोजी सलग चौथ्या दिवशी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी पंचायत समितीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महसूल आरोग्य, पंचायत समिती, जिल्हा परिषदसह विविध विभागातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.
महिलांनी सांभाळली मोर्चाची कमान
सेवानिवृत्तीनंतर मुले मोठी झालेली असतात त्यांच्या शिक्षणाचा खर्च त्यानंतर विविध आजार निवृत्तीनंतर लागतात त्यामुळे मेडिकलचा खर्च वाढलेला असतो. त्यातच रीटायरमेंटचा पैसा खर्च होतो त्यामुळे उर्वरीत आयुष्य चांगले जाण्यासाठी पेन्शन आवश्यक आहे, असे मनोगत संपकरी महिला कर्मचारी प्रा.मनीषा देशमुख यांनी व्यक्त केले. मुख्याध्यापिका रीता शर्मा यांनी आम्ही आमचा हक्क मागत आहोत, भीक मागत नाही. मंत्र्यांना देखील शिक्षकांनी शिकवलं घडवलं म्हणून आज ते या पदावर जाऊन पोहोचले आहेत. याची जाणीव ठेवत जुनी पेन्शन योजना लागू करावी असे आवाहन केले. मनीषा घुले, जलसंपदा विभागाच्या कल्पना सोनवणे, महसूल विभागाच्या साधना खुळे, आरोग्य सेविका सविता चौधरी यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
यावेळी मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटना, कृषी सहाय्यक संघटना, तलाठी संघटना, शिक्षक भारती, माध्यमिक शिक्षक परिषद, उच्च माध्यमिक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, बहुजन शिक्षक संघटना, शिक्षक समन्वय समिती, कास्ट्राईब शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक भारती संघटना, अखिल भारतीय महिला शिक्षक संघटना, कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटना, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, टीडीएफ संघटना, पाटबंधारे विभाग संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बोदवड तहसील कार्यालयावर कर्मचार्यांचा मोर्चा
बोदवड : बोदवड तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर बांधव, आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच विविध प्रशासनातील कर्मचारी व अधिकाार्यांनी बोदवड तहसील कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याचे नेते जाधव यांनी संबोधित केले. शासकीय सेवेतील विविध संवर्गातील कर्मचारी हातात फलक घेऊन मोर्चामध्ये सहभागी झाले. जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
बोदवडमध्ये उर्दू शिक्षक संघटनेचा आंदोलनात सहभाग
बोदवडमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची संख्या 420 असून त्यात महसूल कर्मचारी 34, आरोग्य कर्मचारी 31, भूमी अभिलेख कार्यालय 7, पंचायत समिती कार्यालय 42 आणि कृषी विभाग 8 आहे. अशा एकूण 611 कर्मचार्यांपैकी 542 कर्मचार्यांनी संपात सहभाग नोंदवल्याने कामकाजावर मोठा परीणाम झाला. ज्यामध्ये प्राथमिक व माध्यमिक मराठी व उर्दू शिक्षकांनी जुनी पेन्शन संपात सक्रिय सहभाग घेतल्याने शैक्षणिक प्रक्रियेवर परिणाम झाला. यात बोदवड तालुक्याची जुनी पेन्शन हक्क संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती, प्राथमिक शिक्षक सेना, कास्ट्राईब कर्मचारी संघ, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ व प्राथमिक शिक्षक परिषद व उर्दू शिक्षक संघ सहभागी झाले होते. कर्मचार्यांनी जुनी पेन्शन संपात जिल्हा परीरषद उर्दू बॉईज शाला बोदवडचे मुख्याध्यापक मोहम्मद इशाक, सादिक अहमद, नियामत मिर्झा, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक बोदवड सरचिटणीस मजहर मुख्तार शाह, कोषाध्यक्ष जैनुल आबिदीन, जावेद शाह, आसिफ खान व शाळेतील सर्व महिला शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.