यावल शहरातील सरस्वती विद्यामंदिरात उत्साहात शारदोत्सवाला सुरुवात
झांजपथक, ढोल-ताशांच्या गजरात श्री शारदेची मिरवणूक ; दुष्काळावरील देखावा ठरतोय आकर्षणाचे केंद्र
यावल (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : शहरातील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सालाबादाप्रमाणे यंदाही तीन दिवसीय शारदोत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. शारदोत्सवानिमित्त श्री शारदेची स्थापना व पूजन संस्थेचे आधारस्तंभ रमाकांत देशपांडे यांच्याहस्ते तर पूजन संस्थेचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी यांच्याहस्ते करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी संस्थेचे संचालक प्रकाश जोशी, मुख्याध्यापक तथा उत्सवप्रमुख बी.सी.ठाकूर, उत्सवप्रमुख दीपक पाटील, उपउत्सवप्रमुख मनीष तांबोळी, ज्येष्ठ शिक्षक एन.डी.भारुडे, दीपक जोशी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
झांजपथकाच्या ताल-सुरात आणि ढोल-ताशांच्या गजरात श्री शारदेची शालेय परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण शालेय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मिरवणुकीनंतर श्री शारदेचे विधिवत पूजन करण्यात आले.

दुष्काळावरील देखावा आकर्षण
यंदाच्या शारदोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे दुष्काळाच्या गंभीर सामाजिक प्रश्नावर आधारित साकारण्यात आलेला देखावा होय. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती तसेच त्याचे शेती, पाणी, पर्यावरण आणि सामाजिक जीवनावर होणारे परिणाम याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा देखावा साकारण्यात आला असून, तो उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याचे महत्त्व आणि सकारात्मक जीवनशैलीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीदेवीच्या गीतावर एस.बी.चंदनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आकर्षक सामूहिक नृत्य सादर केले. या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विविध स्पर्धांचे आयोजन
शारदोत्सवाच्या निमित्ताने शालेय स्तरावर रांगोळी स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा, बौद्धिक स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या तिसर्या दिवशी विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये दुष्काळ या सामाजिक विषयावर आधारित विशेष नाटिका विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात येणार असून, त्याद्वारे दुष्काळाच्या समस्येबाबत जनजागृती करण्याचा प्रभावी संदेश दिला जाणार आहे. दुष्काळ हा केवळ नैसर्गिक संकट नसून त्याचा थेट परिणाम शेती, अर्थव्यवस्था, पाणी, पर्यावरण आणि मानवी जीवनावर होत असतो. या सामाजिक प्रश्नाकडे विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक, सामाजिक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून पाहावे, या उद्देशाने सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाने यावर्षी दुष्काळ जनजागृती अभियान हाती घेतले आहे.
शारदोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. पहिल्याच दिवशी विविध उपक्रमांच्या माध्यमातून ज्ञान, संस्कृती, कला, क्रीडा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात शारदोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा कार्यक्रम झाला.



