पहिल्याच माळेला श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरावर खान्देशातील भाविकांची गर्दी
शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात : दाम्पत्यांच्या हस्ते घटस्थापना : हजारो भाविक ज्योत घेवून रवाना
यावल (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : यावल तालुक्यातील आडगाव येथून जवळच सातपुड्याच्या कुशीतील श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरवात झाली. दोन दाम्पत्याच्या हस्ते येथे घटस्थापना करण्यात आली. राज्यासह शहरातील राज्यात येथून ज्योत प्रज्वलीत करून हजारो भाविक यंदा येथून पहाटेपासुन निघाले आहे.
दाम्पत्याच्या हस्ते घटस्थापना
श्री क्षेत्र सातपुडा निवासनी आई मनुदेवी मंदिरात रविवारी शारदीय नवरात्रोत्सवास सुरवात झाली. मंदिरात आई मनुदेवीला जल अभिषेक करून शालू परिधान करण्यात आला. विदगाव, ता.जळगाव विकास वारके व जळगाव शहरातील संजय महाजन यांनी सपत्नीक विधीवत घटस्थापना केली. मंदिर संस्थानकडून या दोन दाम्पत्यास घटस्थापनेचा मान देण्यात आला होता. संपूर्ण धार्मिक विधी, पूजा झाल्यानंतर देवीची आरती पुजारी स्वानंद धर्माधिकारी व मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर काळे महाराज यांच्या पार पाडण्यात आली.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील, निळकंठ चौधरी, शिवाजी पाटील, ज्ञानेश्वर पाटील, नितिन पाटील, सतिष पाटील, सुनिल महाजन, महेश पाटील, महेंद्र पाटील, विश्वजीत पाटीलसह सर्व संचालकांची उपस्थिती होती. संस्थेने या नवरात्र उत्सवात नवीन फुलांची सजावट नवीन लायटिंग लावून मंदिर सजविले आहे. त्याचप्रमाणे स्थानिक दुकानदारांनीही आपले दुकाने थाटली. पहिल्याच दिवशी येथे सकाळपासून दर्शनार्थ गर्दी झाली. मंदिर संस्थानकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेबद्दल भाविकांनी मनुदेवी संस्थेचे आभार मानले. मंदिरासह मानापुरीपासुन ते मंदिरापर्यंत रस्त्यावर पोलीस प्रशासन, वनविभाग आरोग्य विभागाचे पथक ठिकठिकाणी थांबुन होते. पहिल्या दिवशी यावल आगाराकडून विशेष एस.टी.बससेवा सुरू करण्यात आली.




