मूलभूत समस्या सुटण्यासाठी भुसावळातील तापी नगरवासीयांची पालिकेत निदर्शने
भुसावळ : रस्त्यांसह पाणीपुरवठा, अस्वच्छता, पथदिवे आदींचा प्रश्न बिकट झाल्याने शहरातील तापी नगरातील संतप्त महिलावर्गासह पुरूषांनी सोमवारी पालिकेवर धडक मोर्चा काढत प्रवेशद्वाराबाहेर निदर्शने केली. यावेळी पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
गटारी तुंबल्याने आरोग्य धोक्यात
तापीनगर भागातील हनुमान मंदिर परीसरातील गटारी तुंबल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून दुर्गंधी वाढली आहे. पालिकेकडे वारंवार तक्रारी करुनही गटारींची स्वच्छता होत नाही तर रस्ता झाडून स्वच्छ करण्यासाठी एकही कर्मचारी येत नाही तसेच तापी नगरातील मंदिरासमोर खुल्या जागेवर पालिकेने लहान मुलांसाठी खेळणी लावली असलीतरी त्यांची दुरवस्था झाली आहे तर बहुतांश पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. सध्या आठवड्यातून एकवेळा होणारा पाणीपुरवठा अस्वच्छ असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे गार्हाणे यावेळी मांडण्यात आली.

पालिकेला दिलेल्या निवेदनावर वामन आनंदा पाटील, वैशाली पाटील, पुष्पलता बारी, अनिता चौधरी, प्रियंका गुप्ता, मीनाक्षी सपकाळे, रंजना वराडे, दीपाली सुरळकर, शीतल चौधरी, पुजा सुरळकर, सविता देखमुख, जहबिया जामनेरवाला, कलाकर नेमाडे आदींसह तापीनगरातील 65 नागरीकांच्या स्वाक्षर्या आहेत.
