व्यापार्याचे लक्ष विचलित करीत तीन लाख लांबवले : जळगावात खळबळ
A businessman in Jalgaon has lost three lakhs in cash per day जळगाव : नारळाचे पोते वाहनात टाकताना अज्ञाताने व्यापार्याला वाहनाची हवा कमी होत असल्याचे सांगत लक्ष विचलीत करीत वाहनातून तीन लाख पाच हजारांची रोकड असलेली बॅग भरदिवसात लांबवल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी गजबजलेल्या दाणाबाजारात घडली. या प्रकरणी व्यापारी संदीप सीताराम परदेशी (35, नवीन रायपूर ग्रामपंचायतीजवळ, कुसुंबा) यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
लक्ष विचलित करीत लांबवली बॅग
जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुबा येथे संदीप परदेशी यांचे गावात होलसेल किरणा माल विक्रीचे दुकान असून मंगळवारी ते कार (एम.एच.19 सी.झेड.9221) ने आले असता त्यांनी अमित ट्रेडर्सच्या व्यापार्याला एक लाख रुपये दिल्यानंतर दाणा बाजारात आल्ले व त्यांनी वि.आर.ट्रेडर्स येथून नारळाचे पोते घेत ते कारमध्ये ठेवले व कार वळवत असताना एका संशयीताने व्यापार्याजवळ येत मागील चाकाची हवा कमी होत असल्याचे सांगून व्यापार्याचे लक्ष विचलित केले व व्यापारी मागे वळताच भामट्याने बॅग घेवून पोबारा केला. या बॅगेत तीन लाख पाच हजारांची रोकड होती.
पोलिसांची घटनास्थळी धाव
याबाबतची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनराव पाटील, शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयीताचा शोध सुरू करण्यात आला. व्यापारी संदीप परदेशी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक रमेश शेंडे करीत आहेत.