चार हजारांचे लाच प्रकरण ; फैजपूरच्या लाचखोर पोलिसांची पोलिस कोठडीत रवानगी


भुसावळ : पत्त्याच्या क्लबवर कारवाई न करता क्लब सुरळीत सुरू राहू देण्यासाठी तडजोडीअंती चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना फैजपूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार हेमंत वसंत सांगळे (52, भारत एंटरप्रायजेस मागे, यावल रोड, फैजपूर), पोलिस नाईक किरण अनिल चाटे (44, रा.विद्या नगर, फैजपूर) व नाईक महेश ईश्वर वंजारी (38, रा.लक्ष्मी नगर, फैजपूर) यांना शुक्रवारी दुपारी तीन वाजता फैजपूर पोलि स ठाण्यात अटक करण्यात आली होती. संशयित आरोपींना शनिवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 27 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पोलिस ठाण्यातच स्वीकारली लाच
पाडळसे येथील 30 वर्षीय तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा बामणोद येथे पत्त्यांचा क्लब असून बामणोद बीटसाठी सांगळे व चाटे यांच्याकडे जवाबदारी आहे. तक्रारदाराच्या पत्त्याच्या क्लबवर कोणतीही जुगाराची कारवाई न करता जुगाराचा क्लब सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा चार हजार रुपये देण्याची मागणी शुक्रवारी करण्यात आली होती शिवाय सांगळे यांनी त्यांच्या फोनवरून नाईक चाटे यांच्याशी बोलणी करून दिल्यानंतर सांगळे यांनी पोलिस ठाण्याच्या आवारातच लाच स्वीकारून ती रक्कम नाईक वंजारी यांना दिल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. दोघा आरोपींनी दर महिन्याला तीन हजार व गोपनीय शाखेतील कर्मचार्‍यांसाठी एक हजारांची मागणी केल्याचे एसीबीला मिळालेल्या संभाषणात स्पष्ट झाल्याने तिघांना अटक करण्यात आली. शनिवारी भुसावळ सत्र न्यायालय हजर केले असता 27 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक एस.के.बच्छाव, निरीक्षक एन.एन.जाधव करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !