पत्नीशी अनैतिक संबंधाचा संशय : चोपडा तालुक्यात भावाचाच केला खून ; आरोपी जाळ्यात
Suspected of having an immoral relationship with his wife: Brother was killed in Chopda taluka; Accused in the net अडावद, ता.चोपडा : आपल्या पत्नीशी मोठ्या भावाचे अनैतिक संबंध असल्याचा लहान भावाला संशय असल्याने त्यातून वारंवार होत असलेल्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा रूमालाने गळा आवळून व पोटात विळा मारून खून केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी पारगाव शिवारातील शेत गट क्रमांक 185 मध्ये घडली. या घटनेत संदीप प्रताप पाटील (40) या युवकाचा खून झाला असून संशयित आरोपी तथा मयताचा लहान भाऊ सतीश प्रताप पाटील (38, मितावली) यास अडावद पोलिसांनी अटक केली आहे.
अनैतिक संबंधाचा संशय बेतला जीवावर
मितावली येथील प्रताप मंगा पाटील हे पत्नी, दोन मुलांसह राहतात. त्यांच्याकडे 10 एकर शेती आहे. त्यांची दोन्ही मुले एकत्रीत शेती करतात. शनिवारी सकाळी संदीप पाटील (40) व सतीश पाटील (38) हे शेतात भेंडी तोडण्यासाठी गेले असता संदीप व सतीश यांच्यात वाद सुरू झाला. सतीश यास आपली पत्नी कविता हिचे आपला मोठा भाऊ संदीप याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्याने भावाला याबाबत जाब विचारल्यानंतर दोघांमध्ये टोकाचे भांडण झाले व त्याचवेळी सतीने भाऊ संदीपचा रुमालाने गळा आवळून खून केला व तसेच पोटावर विळ्याने सपासप वार करून त्याचा खून केला.

अडावद पोलिसांची धाव
खुनाची माहिती कळताच अडावदचे सहा.निरीक्षक गणेश बुवा, फौजदार चंद्रकात पाटील, सहायक फौजदार सुनील तायडे, जयदीप राजपूत हे घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी संशयित आरोपी सतीश पाटील यास ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळी जळगाव येथून ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते.
शेतातच घेतले ताब्यात
घटनेनंतर संशयित सतीश भेंडी घेऊन बैलगाडीने शेजारील गावात विक्रीसाठी गेला. काही वेळाने या भागातील मेंढपाळ पिण्याचे पाणी घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांना संदीपचा मृतदेह दिसला, त्यानंतर ही घटना उघड झाली. अडावद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर काही वेळानंतर सतीश येताच त्यास अटक करण्यात आली.