नशिराबादनजीक भीषण अपघात : मध्यप्रदेशातील दोघे मित्र जागीच ठार
भरधाव ऑईल टँकरची दुचाकीला जबर धडक : अपघातानंतर वाहतूक ठप्प
Horrific accident near Nashirabad: Two friends from Madhya Pradesh were killed on the spot भुसावळ : भरधाव ऑईलने भरलेल्या टँकरने दुचाकीला उडवल्याने मध्यप्रदेशातील दोघे मित्र जागीच ठार झाले. हा भीषण अपघात राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद फाट्यावर रविवारी दुपारी दोन वाजता घडला. संदीप मानसिंग शिरसाम (24) व बसंत मुन्ना वरखेडे (28, दोन्ही रा.धमण्या, जि.बैतूल, मध्यप्रदेश) असे दोन्ही मयत मित्रांची नावे आहेत. दरम्यान, अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली होती.
भरधाव टँकरने उडवल्याने अपघात
मध्यप्रदेशातील आदिवासी तरुण संदीप मानसिंग शिरसाम (24) आणि वसंत मुन्ना वरखेडे असे दोघेही एमआयडीतील चटई कंपनीत कामाला होते. रविवारी दोन वाजता ते दुचाकी (एम.पी.48.एम.आर.5397) ने गावी जाण्यासाठी निघाले असताना जळगाव तालुक्यातील नशिराबादजवळ भुसावळकडून जळगावच्या दिशेने येणार्या ऑईलच्या टँकर (एम.एच.04 डी.एस.2217) या ने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील संदीप व बसंत या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे यांच्यासह सहाय्यक फौजदार अलियार खान, अतुल महाजन, रुपेश साळवे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. महामार्गावरील मयत तरुणाचे मृतदेह तातडीने खाजगी गाडीतून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताला कारणीभूत असलेला टँकर व चालकाला नशिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तरुणांच्या अपघाती निधनाने शोककळा
मयत संदीप शिरसाम याच्या पश्चात आई, वडील पत्नी, दोन वर्षाचा मुलगा, तीन वर्षाची मुलगी, दोन भाऊ दोन विवाहित बहिणी तर बसंत याच्या पश्चात आई, वडील पत्नी दोन वर्षाची मुलगी, दोन भाऊ एक विवाहित बहिण, असा परीवार आहे. दोन्ही तरुणाच्या चिमुकल्यांचे कोवळ्या वयातच पितृछत्र हरपले आहे. जळगावातील नातेवाईकांच्या माध्यमातून अपघाताची माहिती मयताच्या कुटुंबियांना देण्यात आली. दोघांचे कुटुंबिय मध्यप्रदेशातील बैतुल येथून जळगावकडे येण्यासाठी निघाले आहेत.
