दुचाकी परत करण्याच्या बहाण्याने तरुणाला बोलावून केला खून : जळगावातील चौघा आरोपींची खुनानंतर कबुली


Called the youth and killed him on the pretext of returning the bike : Four accused in Jalgaon confessed after the murder जळगाव : दुचाकी परत देण्याच्या वादातून तरुणाने शिविगाळ केल्यानंतर चौकडीने चॉपरने हल्ला करीत तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केटमध्ये रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत सोपान गोविंदा हटकर (25, हरीविट्ठल नगर, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी जळगाव गुन्हे शाखेने अवघ्या चार तासात खुनानंतर चार आरोपी निष्पन्न करीत त्यांना अटक केली. खुनाच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे तर गेल्या आठ दिवसात खुनाची ही चौथी घटना घडल्याने कायदा सुव्यवस्थादेखील ऐरणीवर आली आहे. दरम्यान, खून प्रकरणी ज्ञानेश्वर उर्फ नानू दयाराम लोंढे (कंजरवाडा, जळगाव), राहुल भरत भट (खोटे नगर, जळगाव), गोविंद उर्फ चेरी शांतीलाल झांबरे (कंजरवाडा, जळगाव) व करण सुभाष सकट (कोंडवाडा, बी.जे.मार्केट, जळगाव) यांना अटक करण्यात आली.

दुचाकी देण्याच्या बहाण्याने बोलावत केली हत्या
जळगाव शहरातील हरी विठ्ठल ल नगरात सोपान हटकर हा आई सोबत वास्तव्यास होता. सेंट्रींग तसेच मिळेल ते मजुरी काम करून तो उदरनिर्वाह भागवत होता,तर त्याची आई धुणी-भांडीचे काम करते. सोपान याने काही दिवसांपूर्वी फायनान्सवर हप्त्याने दुचाकी घेतली मात्र हप्ते थकल्याने शोरुम कंपनीवाले ही दुचाकी ओढून घेवून जातील या भीतीने सोपानने त्याची दुचाकी त्जळगाव तालुक्यातील रींगणगाव येथील रहिवासी मामा सुपडू अर्जून पाटील यांच्या शेतातील खळ्यात लपवून ठेवली मात्र ही बाब संशयित आरोपी तथा त्याचे मित्र यांना कळाल्यानंतर त्यांनी तिचा वापर सुरू केला व रविवार, 26 मार्च रोजी दुपारी गोविंदा झांबरे व ज्ञानेश्वर हे दोघेही सोपान याची दुचाकी घेवून पारोळा येथे लग्नाला गेल्याची बाब सोपानला कळताच त्याने फोन करुन दुचाकी परत द्या म्हणून दोघांना जळगावला बोलावले. गोविंदा व ज्ञानेश्वर यांनी दुचाकी परत घेण्यासाठी सोपान यास जळगाातील गोलाणी मार्केट येथे बोलावले. त्यानुसार सोपान त्याची दुचाकी घेण्यासाठी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केट येथे गेल्यानंतर तेथे दुचाकीवरून वाद सुरू झाला. गोविंदा, ज्ञानेश्वर व त्यांच्यासोबत असलेल्या राहूल भरत भट व करण सुभाष सकट या चार जणांनी सोपानवर चॉपरने सपासप वार करत त्यांचा खून केला. यावेळी सोपान सोबत असलेल्या शुभम परदेशी व मुकेश लोंढे या दोन जणांनी या घटनेची माहिती सोपान याच्या आईला कळविली.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
खुनाची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक संदीप गावीत, गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजन पाटील शहर पोलिस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल, पोलिस हवालदार भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धांडे, अमोल ठाकूर, उमेश भांडारकर, तेजस मराठे, योगेश इंधाटे, रतन गीते यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात येवून खाजगी वाहनातून सोपान याचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी मयत सोपान याची आई सरलाबाई गोविंदा हटकर (47) यांच्या फिर्यादीवरुन चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चार तासात आरोपी जाळ्यात
जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या नेतृत्वात पथकाने सुरुवातीला ज्ञानेश्वर व गोविंद यांना तर राहुल व करण यांना नंतर अटक करण्यात आली. खुनाच्या घटनेनंतर चार तासात आरोपींना अटक करण्यात यंत्रणेला यश आले. ही कारवाई उपनिरीक्षक गणेश चौभे, अमोल देवढे, विजयसिंग पाटील, राजेश मेढे, संजय हिवरकर, कमलाकर बागुल, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, संदीप पाटील, महेश महाजन, अक्रम शेख, संदीप सावळे, संतोष मायकर, विजय पाटील, प्रवीण मांडोळे, दर्शन ढाकणे, ईश्वर पाटील, लोकेश माळी आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !