दीपनगरात अवैध रेतीचा पुरवठा
वंचित बहुजन आघाडीचे प्रशासनाला निवेदन
भुसावळ : दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्रात होत असलेल्या नवीन बांधकामाच्या ठिकणी अवैधरीत्या वाहतुकीतून आलेल्या रेतीा पुरवठा केला जात असून या रेतीबाबत शासनाची कोणतीही रॉयल्टी भरण्यात आलेली नाही शिवाय परमिट आणि इतर नियम धाब्यावर बसवून अधिकृतपणे रेतीचा पुरवठा केला जात असल्याने या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी तसेच प्रकल्पामध्ये सुरू असलेल्या कामामध्ये वाळुमिश्रीत रेतीचा वापर होत असल्याने याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी मुख्य अभियंता विवेक रोकडे, स्थापत्य विभागाचे उपमुख्य अभियंता मनोहर तायडे यांच्याकडे केली.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
660 प्रकल्पामध्ये किमान वेतन अधिनियम 1948 मधील तरतुदींचे पालन करावे व निविदा धारकांकडून नियमाप्रमाणे सुरक्षा अनामत आयकर व अन्य कर वस्तु, सेवाकर (जीएसटी) शासनाचे वेळोवेळी लावण्यात येणारे कर देयकातून कपात करण्यात येत नसल्याने याबाबतही चौकशी करावी तसेच निविदाधारकांनी अदा केलेल्या दरमहा भविष्य निर्वाह निधी भरल्याच्या पावती सादर करणे बंधनकारक असल्याने त्याबाबतही चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी मुख्य अभियंता विवेक रोकडे, स्थापत्य विभागाचे उपमुख्य अभियंता मनोहर तायडे यांच्याकडे करण्यात आली. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे, भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे मेजर यांची उपस्थिती होती. मागण्यांची दखल घेण्यात न आल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

