जळगाव नगरीत रामनवमी मिरवणुकीत प्रभू श्रीरामांचा जयघोष
Jalgaon City Ramnavmi procession in Jalgaon Lord Shri Ram जळगाव : मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, लेझीम पथकाचे सादरीकरण आणि सजीव देखाव्यांनी शहरवासीयांच्या डोळ्याचे पार फेडले. श्रीराम नवमीनिमित्त गुरुवारी सायंकाळी सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. श्रीराम भक्तांची मोठ्या संख्येने मिरवणुकीत गर्दी होती.
आरतीनंतर मिरवणुकीला सुरूवात
सुरुवातीला कारसेवकांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत गोलाणी मार्केटजवळील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आरती करण्यात आली. यावेळी कारसेवक मुकुंद धर्माधिकारी, सचिन नारळे, पुरुषोत्तम बारी, मुकुंद कासार, मुकुंद मेटकर, महापौर जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे, डीवायएसपी संदीप गावित, प्रशिक्षणार्थी डीवायएसपी सतीश कुलकर्णी, सुनील भंगाळे, सुरेश तलरेजा, ललित कोल्हे, किशोर भोसले, अमित भाटीया, दीपक जोशी, ललित चौधरी, विष्णु भंगाळे, शरद तायडे, अमित काळे, बंटी नेरपगारे, अजय गांधी, अजिंक्य देसाई, पियूष कोल्हे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

लेझीम पथकांचा सहभाग
ढोलताशांच्या निनादात आणि श्रीरामाच्या जयघोषात शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेच्या अग्रस्थानी श्रीराम रथ होता. त्यानंतर मुलींचे लेझीम पथक, श्रीराम व सीता यांचा सजीव देखावा, छत्रपती शिवाजी महाराज, श्रीराम व रामभक्त हनुमान यांची मूर्ती असलेला रथ लक्ष वेधून घेत होता.