अपघात थांबेना : जळगावात भरधाव क्रेनच्या धडकेने महिलेचा मृत्यू
Accidents do not stop : Woman dies after being hit by a speeding crane in Jalgaon जळगाव : शहरात आठवडाभरापासून अपघातांची मालिका कायम असून घराकडे पायी निघालेल्या 53 वर्षीय महिलेले भरधाव क्रेनने उडवल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास एमआयडीसी परीसरातील माधुरी वेअर हाऊसनजीक घडली. या घटनेत रंजना उत्तम येसे (53, म्हाडा कॉलनी, जळगाव) या महिलेचा मृत्यू ओढवला. अपघाताची घटना सीसीटीव्ही कैद झाली असून क्रेन चालकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
घराकडे निघाल्यानंतर गाठले मृत्यूने
जळगावच्या म्हाडा कॉलनीत रंजना येसे या मुलगा आणि सुन यांच्यासोबत वास्तव्याला होत्या. मुलगा विकास हा खाजगी कंपनीत नोकरीला आहे तर रंजना येसे यांचे राका चौकात लाँड्री दुकान आहे. कपडे इस्त्री करून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या. शुक्रवार, 31 मार्च रोजी सकाळी दुकान उघडून साफसफाई करून त्याचा घरी पायी निघाल्या असता सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास मागून येणारा क्रेन क्रमांक (एम.एच.40 पी 2309) ने जोरदार धडक देताच त्या जमिनीवर पडल्या आणि क्रेनचे पुढचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरीकांनी धाव घेत क्रेन चालकाला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात दिले. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. मयत महिलेच्या पश्चात मुलगा विकास, विवाहित मुलगी, सुन आणि नात असा परीवार आहे.
