मधमाशांच्या हल्ल्यात पित्याचा मृत्यू ; मुलगा बचावला : नगरदेवळ्यात शोककळा
Father’s death due to bee attack; Boy saved : Mourning in Nagardevla नगरदेवळा, ता.पाचोरा : रोजंदारीचे काम करून घराकडे निघालेल्या पिता-पूत्रांवर मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यानंतर 58 वर्षीय प्रौढाचा मृत्यू ओढवला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता गावाजवळील शिंदोळ रस्त्यावर घडली. या घटनेत सैय्यद सबदर सैय्यद ईस्माईल (58, नगरदेवळा, ता.पाचोरा) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा सैय्यद आबीद हा जखमी झाला.
पित्याचा जागीच मृत्यू
सैय्यद सबदर सैय्यद ईस्माईल (58, नगरदेवळा, ता.पाचोरा) व त्यांचा मुलगा सैय्यद आबीद हे शुक्रवारी दुपारी शेतात रोजंदारी कामावरून घराकडे नगरदेवळा येथे परतत असताना वडाच्या झाडावर बसलेल्या मधमाशांचा पोळ अचानक उठल्यानंतर मधमाशांनी डंख मारणे सुरू केल्याने सफदर यांचा जागीच मृत्यू ओढवला त्यांचा मुलगा सैय्यद आबीद हा जखमी झाला. अत्यवस्थ अवस्थेत त्यास पाचोरा येथे हलवण्यात आले व तेथून जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मयत सैय्यद यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा असा परीवार आहे. त्यांच्या परीवाराची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने शासनाकडून त्यांच्या परीवारास आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे.
