भुसावळात उद्योग, व्यवसाय करीअर मार्गदर्शन मेळाव्याला प्रतिसाद
तेजोदीप नवविचार फाउंडेशन व स्वावलंबी भारतच्या विद्यमाने संयुक्त उपक्रम
भुसावळ : तेजोदीप नवविचार फाउंडेशन व स्वावलंबी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात रविवार, 2 एप्रिल रोजी उद्योग व्यवसाय करीअर मार्गदर्शनपर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विचार मंचावर डॉ.अतुल सरोदे, जयंतीलाल सुराणा, डॉ.युवराज परदेशी, संतोष मराठे, श्रीकांत झाबरे, प्रज्ञा साळवे, गिरीश कुळकर्णी, सुनीता मोडक, राजेश नेहते आदींची उपस्थिती होती. फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश नेहते यांनी प्रास्ताविक केले. यावेळी फाउंडेशनच्या संकेतस्थळाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुनीता मोडक यांनी महिला स्वयंरोजगार यावर मार्गदर्शन केले तर श्रीकांत झांबरे यांनी कृषी, सरकारच्या योजना यावर मार्गदर्शन केले. यावेळी शेती बद्दल प्रश्न-उत्तरे ही झाली.
बिझनेस व स्टार्टअप भिन्न बाबी : डॉ.युवराज परदेशी
डॉ.युवराज परदेशी यांनी स्टार्टअप इंडियावर मार्गदर्शन करतांना तुमचा व्यवसाय तुमची विशेषता समोर आणा, हे स्टार्टअप आहे असे सांगितले. केळीचा व्यवसाय करताना त्याच्या विविध प्रॉडक्ट्सचा विचार करून व्यवसाय सुरू करता येतो ते स्टार्टअप होईल. बिझनेस आणि स्टार्टअप यातील फरक त्यांनी सांगितला. प्रज्ञा साळवे यांनी सूक्ष्म अन्न प्रक्रिया यावर मार्गदर्शन करतांना उद्योग व व्यवसाय याबद्दल माहिती दिली. या उद्योगासाठी 35 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकते. संतोष मराठे यांनी स्वावलंबी भारत अभियानावर माहिती देतांना नोकरीच्या मागे न लागता नोकरी निर्माण करणारे व्हा, हजारो योजना सरकारी अनुदानाशी संबंधीत आहेत. सबसिडी मिळणार्या योजनांची माहिती घेऊन व्यवसाय सुरू केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी जयंती सुराणा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.अतुल सरोदे यांनी समारोपीय भाषणात मी डॉक्टर सोबत शेतकरी असल्याचे अभिमानानं सांगतो. श्रमाची लाज बाळगायची नाही. सर्वात आधी व्यवसाय करायचा आहे ही ईच्छा व्हायला हवी. स्वावलंबी भारत सहाय्य करण्यासाठीच आहे, असे सांगितले. सूत्रसंचालन धर्मराज देवकर यांनी तर आभार ज्ञानदेव पाचपांडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

यश मिळवणार्या मान्यवरांचा सन्मान
विविध क्षेत्रातील विशेष कार्य तसेच यश प्राप्त करणार्या नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. भावेश जंगले, स्वाती पाचपांडे, रचना पाटील, प्रतिभा जावळे, निलेश बाकसे, दिलीप पाटील, ललित इंगळे, भरत पाटील, ह.भ.प.पंढरीनाथ पाटील, ह.भ.प.संजय चौधरी, विलास वराडे, धर्मराज देवकर, निखील लोखंडे, किरण पाटील, राजेंद्र राणे व डॉ.राहुल सूर्यवंशी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमस्थळी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, समाजसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे, सामाजिक कार्यकर्ते सतीश सपकाळे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष सोनवणे, महालक्ष्मी ग्रुपचे अध्यक्ष अनिकेत पाटील, रेल कामगार सेनेचे ललित मुथा, शिवसेना शहरप्रमुख हेमंत खंबायत, रमाशंकर दुबे, विशाल ठोके आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.