कृउबा निवडणूक : 410 उमेदवारी अर्ज दाखल
बाजार समित्यांना यात्रेचे स्वरूप ः भुसावळात खडसे-चौधरींविरोधात सावकारेंचा मुकाबला
भुसावळ : भुसावळ विभागातील भुसावळसह यावल रावेर, बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी उन्हाळ्यात राजकीय आखाडा तापला आहे. भाजपाने एकला चालो रे भूमिका घेतली असलीतरी सर्वांना सोबत घेत काँगे्रस-राष्ट्रवादी-सेनेने (ठाकरे गट) महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढण्याची तयारी केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत पक्ष नसलातरी राजकीय पक्षांशिवाय निवडणुका नाहीत हेदेखील तितकेच खरे ! सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने कृउबांना यात्रेचे स्वरूप आले होते तर नेत्यांसह कार्यकर्त्यांनी अर्जांबाबत यावेळी आढावा घेतला. भुसावळसह विभागात सोमवारी 410 अर्ज दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, रावेरात मात्र जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा रंजना पाटील यांचे पती तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील यांचा उमेदवारी अर्जच चोरीला गेल्याने मोठी खळबळ उडाली. दुसरा अर्ज दिल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली.
भुसावळ : एकूण 80 अर्ज दाखल
भुसावळ : भुसावळ कृउबात आमदार एकनाथराव खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांच्या विरोधात आमदार संजय सावकारे यांना मानणार्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होईल. महाविकास आघाडी व भाजपाने सर्वच जागांवर लढण्याचा दावा केला असून माघारीनंतर अंतीम चित्र स्पष्ट होईल. तत्कालीन सभापती सचिन संतोष चौधरी यांनी या निवडणुकीत अर्ज दाखल केलेला नाही तर माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे हा नवीन चेहरा राष्ट्रवादीने दिल्याने ते पक्षातर्फे सभापतीपदाचे दावेदार असू शकतात तर भाजपातर्फे मनीषा भालचंद्र पाटील या दावेदार असण्याची शक्यता आहे. असे असलेतरी माघारीनंतरची राजकीय स्थिती व मतदानावेळी मतदारांचा कल कुणाकडे असेल ? यावर विजयाची गणिते अवलंबून असणार आहेत. दरम्यान, कृउबासाठी आजअखेर 80 तर सोमवारी 67 अर्ज दाखल करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत वीरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी अय्युब तडवी यांनी सांगितले.

छाननीअंती होणार चित्र स्पष्ट
सूत्रांच्या माहितीनुसार, सेवा सहकारी संस्था सर्वधारण गटातून 26, सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्ग गटातून 10, सेवा सहकारी संस्था महिला राखीव गटातून आठ तर सेवा सहकारी संस्था विजाभम गटातून सहा, ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून 13, अनु.जाती-जमाती गटातून चार तर ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केला. व्यापारी मतदारसंघातून आठ तसेच हमाल-मापाडी मतदारसंघातून चार अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान, 5 रोजी छाननी, 6 रोजी अंतिम यादी प्रसिद्धी तर 6 ते 20 माघारी, 21 रोजी चिन्ह वाटप व 28 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे.
यावल : 18 जागांसाठी 144 अर्ज
यावल : यावल बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 95 उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर बाजार समितीच्या 18 जागांसाठी एकूण 144 अर्ज प्राप्त झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी येथील बाजार समितीच्या कार्यालयात इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली. प्राप्त अर्जांची छाननी बुधवार, 5 एप्रिल रोजी होणार आहे. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी झाली. यात शेवटच्या दिवशी विविध राजकिय पक्षांसह अपक्ष इच्छुकांनी तब्बल 95 अर्ज दाखल केले व मुदतीत बाजार समितीच्या एकूण 18 जागांसाठी एकूण 144 अर्ज प्राप्त झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने येथे सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत विविध राजकिय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते थांबून होते. बाजार समितीच्या सभागृहात नामनिर्देशन पत्र स्विकारण्याकरीता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.एफ.चव्हाण, सहाय्यक एम.पी.भारंबे, डी.व्ही.ठाकूर, एस.डी.केदारे, राहुल येवले, मनिष कांबळे, एस.के.देशमुख यांनी कामकाज पाहिले. दरम्यान, आता 5 रोजी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी तर 6 एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंत माघारीसाठी मुदत तर शुक्रवार, 21 एप्रिल रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करीत चिन्ह वाटप तसेच 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
बोदवड : 186 अर्ज दाखल
बोदवड : 18 सदस्य निवडीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत असून उपबाजार वरणगाव, मुक्ताईनगर, कुर्हाकाकोडा हे या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे. मुख्य कार्यालय बोदवड असून 15 एकराच्या परिसरात ही कृषी उत्पन्न बाजार समिती पसरलेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 186 अर्ज दाखल झाले आहेत.
