यावल शहरात बालाजी महाराजांच्या जयघोषात रथोत्सवाला सुरूवात

यावलला रथाची रात्रभर परीक्रमा : खंडोबा महाराजांच्या बारागाड्या उत्साहात ओढल्या


Rathotsava begins in Yaval city with the shouts of Balaji Maharaj यावल : शहरातील श्री बालाजी महाराज रथोत्सवाला गुरूवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात सुरवात झाली. श्री महर्षी व्यास मंदिराजवळील हडकाई-खडकाई नदी पात्रात विधीवत पूजन करून रथ ओढण्यास सुरवात झाली. रात्रभर शहरातील मुख्य मार्गावरून हा रथ मार्गस्त होणार आहे व पहाटे त्याचा समारोप होईल. दरम्यान, रथ महाराणा प्रताप नगराजवळील खडकाई नदीच्या पुलावर आल्यानंतर महाराणा प्रताप नगरातील खंडोबा महाराज यात्रोत्सवाला सुरूवात झाली. त्यानंतर चोपडा रस्त्यावरून बारागाड्या मोठ्या उत्साहात ओढण्यात आल्या.
यावल शहरात शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्री बालाजी महाराज रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी रथोत्सव साजरा होतो व गुरूवारी सायंकाळी श्री महर्षी व्यास मंदिरापासून हडकाई-खडकाई नदीपात्रात रथाची पूजा मंदार देशमुख व देशमुख या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात श्री बालाजींच्या रथाची महापुजा पार पाडल्यानंतर रथयात्रेस प्रारंभ झाला.

बालाजी महाराजांच्या जयघोषात ओढल्या बारागाड्या
व्यास मंदिर ते महाराणा प्रताप नगरापर्यंत सुमारे एक किलोमीटर नदीपात्रातून श्री बालाजी महाराजांच्या जयघोषात नागरीकांनी रथ ओढत आणला व त्याचवेळी खंडोबा महाराजांच्या बारागाड्यादेखील चोपडा रस्त्यावरून नदी पात्रापर्यंत ओढण्यात आल्यात. बारागाड्या ओढण्याचा मान गोपालसिंग बडगुजर (बर्‍हापणपूर) यांना मिळाला होता. रथोत्सव, यात्रा आणि बारागाडया पाहण्यासाठी मोठ्या संख्येत भाविक, भक्तांची शहरात गर्दी झाली होती. महाराणा प्रताप नगरातील बारागाड्यांचा कार्यक्रम पार पडल्यावर रथयात्रेचे शहरात आगमन झाले. रथाच्या पूजन व स्वागताकरीता घरा-घरातून भाविकांकडून स्वागत व पूजन केले जात होते. ही रथयात्रा संपूर्ण रात्रभर शहरातून मार्गक्रमण करीत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भवानी माता मंदिराजवळ या रथोत्सवाची सांगता होणार आहे. रथमार्गावर महिलांनी आपापल्या घरासमोर रांगोळ्या काढल्या असून रथपूजा केली जाते. या रथोत्सवात कायदा व सुव्यवस्थेकरीता यावल पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, उपनिरीक्षक सुनील मोरे व सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

शहरातून असा मार्गस्त झाला रथ
शहरात दाखल झालेला रथ हा चावडी, मेनरोड, बोरावलगेट, देशमुखवाडा, लक्ष्मीनारायण मंदिरमार्गे देवीच्या मंदिराजवळ पहाटेच्या सुमारास रथोत्सवाची सांगता होते. शहरातील अरुंद व चढ-उताराचे रस्ते, रथाची भव्य उंची, सुमारे 12 टन वजन असलेल्या या रथास मोगरी लावणे, त्यास वळविणे ही कामे अत्यंत अवघड असून कसब पणास लावावे लागते. यासाठी पुर्वीपासूनची नेमलेली मंडळीच ही कामे करतात. रथासोबत असेलेले विशिष्ट पेहरावातील भालदार-चोपदार मंडळी शहरवासीयांचे लक्ष वेधत होते.

पारंपरीक वहन लक्षवेधी
या रथोत्सवात पारंपरीक वहनदेखील लक्षवेधी ठरले डोक्यावर अवजड अशा स्वरूपातील मोरपंखाचे मुकूट चेहरा सेंदूरने माखलेला व यात पारंपरीक वाद्यावर नृत्य वहन पथक करीत होते. देशमुखवाडा मोठा मारुतीपासून वहनाची सुरुवात झाली. वहन हे पिंप्राळा जळगाव येथील जय भवानी ग्रुपचे होते. यात कलावंत दिलीप कोळी, सचिन सोनार, अशोक शिंपी यांचा सहभाग होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !