टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या नावाखाली 11 लाखांचा गंडा : पश्चिम बंगालची टोळी जाळ्यात
जळगाव सायबर पोलिसांची कामगिरी : संशयितांना 8 मे पर्यंत पोलीस कोठडी
11 lakh scam in the name of tours and travels: West Bengal gang in the net जळगाव : जळगाव सायबर पोलिसांनी टूर्सच्या नावाखाली जळगावातील डॉक्टरांना 11 लाखांचा गंडा घालणार्या पश्चिम बंगालमधील टोळीला अटक केली आहे. आरोपींकडून आठ मोबाईल, तीन संगणक हार्डडिस्क, लॅपटॉप आणि आठ एटीएम कार्ड, चेक बुक व 20 हजारांची रोकड जप्त केली आहे. रीकार्डो गोम्स क्रिस्टफर गोम्स (36), प्रियांशू बिस्वास सैवाल बिस्वास (23), अनिकेत बिस्वास अभिजीत बिस्वास (24, सर्व रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) अशी भामट्यांची नावे असून संशयितानां न्यायालयाने 8 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सायबर पोलिसात गुन्हा
जळगावातील डॉ.उल्हास बेंडाळे व त्यांचे दहा सहकार्यांना सेव्हर सिस्टर पाहण्यासाठी जायचे असल्याने त्यांनी सोशल मिडीयावर थींकट्रीप ट्रॅव्हल्स या नावाची जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीच्या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना संबंधित व्यक्तीने अॅडव्हान्स तीन लाख 15 हजार रुपये तसेच टूर बुक झाली म्हणून सात लाख 20 हजार रुपये आणि आरटीपीसीआर व क्वारंटाईन झाले तर हॉटेल बुक करण्यासाठी 68 हजार 800 रूपये असे लागतील सांगण्यात आले. त्यानुसार बेंडाळे यांनी 11 लाख तीन हजार 800 रुपयांची रक्कम उकळली. काही दिवसांनी डॉ.बेंडाळे यांना बुकींग झालेच नसल्याची बाब समोर आल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यांनी 13 मार्च 2023 रोजी सायबर पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुरनं.8/2023, भादंवि 409, 420, 34 व आयटी 66 डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.




तांत्रिक विश्लेषणाअंती आरोपी जाळ्यात
गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी बेंडाळे यांना आलेले कॉल, व्हॉटसअॅप मेसेज, ज्या बँक खात्यामध्ये पैसे भरले त्यांची माहिती घेवून सायबर ठगांचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयित कोलकाता येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर निष्पन्न झाली. सायबरचे निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिगंबर थोरात, राजेश चौधरी, दिलीप चिंचोले, गौरव पाटील यांनी पश्चिम बंगाल राज्यातून तिघा आरोपींच्या मुसक्या बांधल्या.