आधी चोरली चारचाकी नंतर अमळनेरसह चोपड्यात फोडले सराफा दुकान : सहा लाखांचा मुद्देमाल लंपास

सुमारे सहा लाखांचा ऐवज लांबवल्याने खळबळ : सीसीटीव्हीचा डीव्हीआरही लांबवला


अमळनेर : शहरात आलेल्या चोरट्यांच्या टोळीने आधी समर्थ नगरातून चारचाकीची चोरी केली व नंतर शहरातील सप्तश्रृंगी कॉलनीतील ज्वेलर्स दुकान फोडून सोन्याचे दागिने व रोकड असा दोन लाख 21 हजारांचा तर चोपड्यातील लक्ष्मी ज्वेलर्समधून सुमारे तीन लाखांची चांदी लांबवल्याचा प्रकार शनिवारी पहाटे उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कारसह दोन्ही दुकानातून चोरी झालेल्या ऐवजाची किंमत सहा लाखांपर्यंत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सीसीटीव्हीतील वर्णनाआधारे चोरट्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

आधी लांबवली चारचाकी
दीपक गोपाळ पाटील (कोल्हापूर) हा तरुण अमळनेर शहरातील पिंपळे रोडवरील समर्थ नगरास्थत आई-वडिलांना भेटण्यासाठी चारचाकी (एम.एच.09 एक्यू.1559) ने आला होता व रात्री त्याने चारचाकी घराबाहेर पार्क केली मात्र चौघा चोरट्यांनी मध्यरात्री ही चारचाकी लांबवत अमळनेरसह चोपडा येथे चोरीसाठी तिचा वापर केला. 70 हजारांची चारचाकी लांबवल्याप्रकरणी दीपक पाटीलच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

अमळनेरात फोडले सराफा दुकान
अमळनेर शहरातील मुंदडा पार्क, सप्तशृंगी कॉलनीत मनीष प्रकाश सोनार (35) यांचे मानसी ज्वेलर्स अ‍ॅण्ड कॉस्मेटिक नावाचे दुकान आहे. शनिवार, 13 मे रोजी मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास समर्थ नगरातून लांबवलेल्या चारचाकीतून चौघे चोरटे दुकानाजवळ आले व त्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. काऊंटरमधील सोन्याचे व चांदीचे दागिने व 50 हजारांची रोकड असा एकूण दोन लाख 21 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला शिवाय जाताना ओळख न पटण्यासाठी सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील चोरून नेला. चोरी होत असताना शुभम खंबायत या तरुणाने हा प्रकार पाहून आरडा-ओरड करताच वाहनातून चोरटे पसार झाले तर याबाबत शुभमने मनीष सोनार यांना माहिती कळवल्यानंतर त्यांनीही धाव घेतली.

पोलीस अधिकार्‍यांची धाव
अमळनेरात सराफा दुकानात झालेल्या धाडसी चोरीची माहिती कळताच घटनास्थळी रात्रीच डीवायएसपी राकेश जाधव, अमळनेर पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांच्यासह पोलिसांनी भेट दिली. जळगाव येथून ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. मनीष सोनार यांनी शनिवारी अमळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी करीत आहे.

चोपड्यातही फोडले दुकान : 14 मिनिटात चोरटे पसार
अमळनेरात सराफा दुकान फोडलेल्या चोरट्यांनी चोपडा शहरातील मुख्य रस्त्यावरील लक्ष्मी ज्वेलर्स या सोन्या-चांदीचे दुकानाचे शटर कापून तीन किलो 200 ग्राम चांदी लांबवली. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. चोपडा शहरातील मुख्य रस्त्यावर हेमंत पुखराज जैन यांचे लक्ष्मी ज्वेलर्स नामक दुकान आहे. पहाटे 3 वाजून 4 मिनिटांनी चोरटे दुकानाजवळ आले व त्यांनी शटर कापून चोरी केली व 3.15 मिनिटात अर्थात केवळ 14 मिनिटात चोरट्यांनी चोरी केल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट झाले असून चोरटे सराईत गुन्हेगार असल्याची दाट शक्यता आहे. चोरी करताना तीन चोरटे दुकानाबाहेर बाहेर उभे होते तर अन्य एक चोरटा चोरी करीत असल्याचे सांगण्यात आले.

चोपडा तालुक्यात नाकाबंदी
चोरीची माहिती कळताच चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील हे घटनास्थळी सहकार्‍यांसह दाखल झाले. चारचाकी वाहनाच्या क्रमांकाच्या आधारे रात्री नाकाबंदी लावण्यात आली मात्र उपयोग झाला नाही तसेच हॉटेल, लॉजेसही तासण्यात आल्या मात्र चोरटे वाहनातून पसार झाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !