भडगावात दरोडेखोरांचा पोलिसावर हल्ला करीत पोलीस वाहनाला धडक, दुकली जाळ्यात, त्रिकूटाचा शोध
Robbery plot foiled in Bhadgaon : Two caught, three escape भडगाव : भडगाव पोलिसांनी दरोड्याच्या प्रयत्नातील दोघा आरोपींच्या मुसक्या बांधल्या असून तिघे मात्र पसार झाले. आरोपींना अटक करण्याच्या प्रयत्नात पोलिसांच्या अंगावर वाहन आणल्याने पोलीस कर्मचारी जखमी झाला असून पोलीस वाहनाचेही नुकसान झाले. ही घटना पिंपळगाव फाटा येथे रविवारी पहाटे पावणेपाच सुमारास घडली. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसाला धडक देत सरकारी वाहनाचे नुकसान
भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रविवार, 14 मे रोजी पहाटे पावणेपाचच्या सुमारास भडगाव शहरात गस्तीवर असताना ठाणे अंमलदाराने पांढर्या रंगाच्या स्कॉर्पिओबाबत माहिती दिल्यानंतर पथकाने पिंपळगाव फाटा येथे वाहन अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर पांढर्या रंगाची स्कार्पिओ कारमधील चालकाने पोलीस कर्मचारी विलास बाबूराव पाटील (52, भडगाव) यांच्या अंगावर वाहन नेल्याने त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली तर नंतर आरोपींचे वाहन पोलिसांच्या सरकारी वाहनावर आदळल्याने या वाहनाचेही नुकसान झाले. यानंतर स्कॉर्पिओमधील तीन संशयित पसार झाले तर दोघांच्या मुसक्या बांधण्यात यंत्रणेला यश आले.
दरोड्याचे साहित्य जप्त
पोलिसांनी तीन लाख रुपये किंमतीचे स्कॉर्पिओ (एम.एच.18 डब्ल्यू.0372), चाव्यांचा गुच्छा, पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल व दरोडा टाकण्याचे साहित्य, लोखंडी रॉड आदी साहित्य जप्त करण्यात आले. घटनास्थळावर मुकेश विठ्ठल पाटील (24, रा.पाळधी, ता.धरणगाव) व रोशन मधुकर सोनवणे (33, रा.अंबिका नगर, वडजाई रोड, धुळे) या दोघांना अटक करण्यात आली तर संशयित शशिकांत सदाशीव मोरे (रा.धुळे), फयाज शेख (रा.पाळधी, ता.धरणगाव) आणि एक अनोळखी असे तीन जण पसार झाले. पोलिसांनी वाहनासह मुद्देमाल हस्तगत केला आहे. भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून रविवारी सकाळी 10 वाजता भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ल तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाले करीत आहे.


