भुसावळसह कजगावातील तरुणाचा उष्माघाताने मृत्यू
वैशाख वणवा पेटला : उष्माघातापासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन
A youth from Bhusawal and Kajgaon died of heat stroke भुसावळ : जिल्ह्याचा पारा 45 अंशावर पोहोचल्यानंतर जनजीवन विस्कळीत झाले असतानाच उष्माघाताचा फटका बसल्याने भुसावळातील रेल्वे कर्मचार्यासह कजगाव, ता.भडगाव येथील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गिरीष शालिग्राम पाटील (29, तुकाराम नगर, भुसावळ) व अक्षय रत्नाकर सोनार (29, कजगाव, ता.भडगाव) मृतांची नावे आहे. दरम्यान, उष्माघातापासून बचावासाठी नागरीकांनी दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.
कजगावातील तरुणाचा उष्माघाताने मृत्यू
कजगाव, ता.भडगाव येथील रहिवासी अक्षय रत्नाकर सोनार (29) या तरुणाला शनिवार, 13 रोजी सायंकाळी अस्वस्थ वाटल्यानंतर दवाखान्यात नेण्यात आल्यानंतर उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. तरुणाच्या पश्चात एक दिड वर्षांचा मुलगा, पत्नी, आई, वडील, भाऊ असा परीवार आहे. तो रत्नाकर सोनार यांचा मुलगा होय. तरुणाच्या मृत्यूनंतर सराफा व्यावसायीकांनी दिवसभर आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली.
मुलीला पाहण्यासाठी आलेल्या तरुण पित्याचा मृत्यू
भुसावळ : पुण्यात रेल्वेत नोकरीस असलेल्या मात्र भुसावळातील मूळ रहिवासी असलेला गिरीष शालिग्राम पाटील (29) या तरुणाचा उष्माघाताने फटका बसल्याने सोमवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. गिरीश हा तरुण गाडेगाव, ता.जामनेर येथे सासुरवाडीला मुलीला पाहण्यासाठी रविवारी गेल्यानंतर सायंकाळी परतला मात्र दुसर्या दिवशी सोमवार, 15 मे रोजी सकाळी त्याला अस्वस्थ वाटल्यानंतर सकाळी 11 वाजेच्या सुमारास नातेवाईकांनी डॉ. राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले उपचाराच्या दहा मिनिटातच तरुणाचा मृत्यू ओढवला. दरम्यान गिरीषचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची माहिती डॉ.मानवतकर यांनी दिली. मयत तरुणाच्या पश्चात आई, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा व एक नवजात मुलगी आहे. बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मंगळवारी मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
