अमळनेरात वरातीत तलवार काढून नवरदेवाचे नृत्य : चौघांविरोधात गुन्हा
अमळनेर : लग्नाच्या वरातीत नवरदेवाने हातात तलवार घेऊन डीजेच्या गाण्यावर ताल धरल्याने दहशत निर्माण केल्याप्रकरणी नवरदेवासह डीजे चालक व इतर दोघांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
तलवार काढून केले नृत्य
अमळनेर शहरातील भोईवाडा कॉर्नरजवळ विकी गोपाल कोळी उर्फ अहिरे याचे लग्न मंगळवारख 16 मे रोजी होते असल्याने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास लग्नाची वरात जात असतांना नवरदेव विकी कोळी याने हातात तलवार घेऊन मित्रांसोबत नृत्य केले. एका हातात तलवार व दुसर्या हातात म्यान दाखवून आणि दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल, असे गाणे वाजवून दहशत निर्माण केल्याचा प्रकार घडल्याने पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र निकुंभे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी तथा नवरदेव विकी गोपाल कोळी, किरण गोपाल कोळी, डीजे चालक यशवंत शांताराम शिंगाने (तिघे रा. भोईवाडा, अमळनेर) आणि विकी भाऊलाल कोळी (रा.शिरपूर) या चार जणांविरोधात अमळनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहे.


