गारबर्डी राखीव वनक्षेत्रातील आठ हेक्टरावरील अतिक्रमण काढले
यावल प्रादेशिक वनविभागाच्या पथकाच्या कारवाईने उडाली खळबळ
Encroachment on eight hectares of Garbardi reserve forest area was removed यावल : यावल प्रादेशिक वनविभागाच्या पथकाने गारबर्डी, सुकी धरण परीसरात असलेल्या राखीव वनक्षेत्रातील अतिक्रमण काढले. या भागात वनवभागाने विशेष मोहिम राबवत तब्बल आठ हेक्टर वनक्षेत्र अतिक्रमण मुक्त केला. या भागात पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी दक्षता म्हणून जेसीबीच्या साह्याने चार्या खोदण्यात आल्या.
वनखंडातील शेतीपट्टे दिल्यानंतरही आदिवासींकडून अतिक्रमण
यावल वनविभाग जळगावमधील यावल पूर्व वनपरीक्षेत्रात गारबर्डी, सुकी धरण परीसरात अनधिकृतपणे अतिक्रमण झाल्याची माहिती वनविभागास मिळाल्यानंतर प्रादेशिक वनवृत्त धुळे येथील वनसंरक्षक दिगंबर पगार, यावल वनविभाग जळगांवचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने सातपुड्यातील गारबर्डी, सुकी धरण परीसरात राखीव वनखंड क्रमांक 37 मध्ये अनधिकृतपणे अवैधरीत्या वन जमिनीवर तब्बल आठ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आलेली शेतीचे अतिक्रमण हटवले. या ठिकाणी खोल समतल चर खोदून चार्या पाडण्यात आल्या तसेच या क्षेत्रात असलेल्या लाकडापासून बनविलेल्या चार झोपड्या काढून नष्ट करीत वनजमीम अतिक्रमणमुक्त करण्यात आली. अतिक्रमणधारकांचे दुसर्या राखीव वनखंडात शेतीचे पट्टे मिळालेले असुन सुध्दा सदरच्या राखीव वनखंडात शेती आणि झोपड्या बांधून अतिक्रमण करत असल्याचे गस्ती दरम्यान आढळून आले.
यांनी हटवले अतिक्रमण
वन जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे, यावल पूर्व वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर, वनपाल अतुल तायडे, रविंद्र तायडे, वनरक्षक सुपडू सपकाळे, युवराज मराठे, भैय्यासाहेब गायकवाड, गोवर्धन डोंगरे, तुकाराम लवटे, प्रकाश बारेला, जिवन नागरगोजे, सतिष वाघमारे, गणेश चौधरी, चंद्रकांत बोरसे, वनमजुर बलदार तडवी सह राज्य राखीव दलाच्या वनतुकडीतील जवानांनी केली.
