भुसावळकरांना दिलासा : सोमवारपासून यावल रस्त्याचे डांबरीकरण
यावल नाका ते तापी नदीपर्यंतच्या रस्त्याचे होणार काम : सार्वजनिक बांधकाम विभागाला आमदार संजय सावकारेंनी केल्या सूचना : उर्वरीत रस्त्याचेही लवकरच काम
भुसावळ : यावल नाका ते तापी नदीपर्यंतच्या रस्त्याचे सोमवारपासून काम होणार असून खड्ड्यांमुळे जर्जर झालेल्या भुसावळकरांसह वाहनधारकांना या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे. अमृत योजनेमुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची वाट लागल्याने सत्ताधार्यांविषयी जनतेतून तीव्र रोष वाढला आहे. त्यातच अमृत योजनेचे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत रस्त्यांची कामे करू नये, असा शासनादेश असल्याने तब्बल तीन वर्षांपासून शहरवासी मरणासन्न यातना भोगत आहेत. दरम्यान, आमदार संजय सावकारे सर्वसामान्य नागरीकांसह वाहनधारकांसह होणारा त्रास लक्षात घेता यावल नाका ते तापी नदीपर्यंत रस्त्याचे काम करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या असून सोमवारपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदारांनी दिली.
खड्ड्यांमुळे हाडे झाली खिळखिळी
रावेरकडून भुसावळमध्ये प्रवेश केल्यावर तापी पूल ते वनविभागाचा तपासणी नाका व तापीनगरच्या कॉर्नरपर्यंतचा तब्बल 700 मीटरचा रस्ता खिळखिळा झाला असून या रस्त्यावर दोन्ही बाजूने 10 ते 12 फूट लांब, दोन ते अडीच फूट रुंद आणि एक ते दीड फूट खोलीचे खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे. रस्ता डागडूजीसाठी पालिकेने पावसाळ्यात या रस्त्यावर मुरुमाचा लेप चढवला तर खड्डे न बुजवल्याने मुरुमामुळे धुळीचे लोट उठत असल्याने रहिवाशांसह वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे.



सोमवारपासून होणार रस्त्याचे काम
यावल रस्त्याचे काम यापूर्वी पालिका प्रशासनाकडून करण्यात येणार होते मात्र नंतर हे काम आमदार निधीतून करण्याचे ठरल्यानंतर प्रत्यक्षात निविदा प्रक्रिया राबवण्यात आली व वाय.एम.महाजन या कंत्राटदाराने हे काम घेतल्याचे समजले मात्र प्रत्यक्षात अद्यापही कामाला सुरुवात न झाल्याने व वाहनधारकांना होणारा प्रचंड मनस्ताप लक्षात घेत आमदार संजय सावकारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना यावल नाका ते तापी नदीपर्यंतच्या रस्त्याचे तातडीने काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. सोमवारपासून काम सुरू होत असल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील अन्य रस्त्यांचे किमान खड्डे बुजावेत
अमृत योजना अपूर्ण असल्याने शहरातील रस्त्यांची कामे खोळंबली आहेत त्यामुळे किमान डांबरीकरण शक्य नसेल तर डागडूजी करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरातील यावल रोड, जळगाव, रोड, आरपीडी रोड, वरणगाव रोड, जामनेर रोड आदी वर्दळीच्या रस्त्यांसह अंतर्गत भागात रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
