एरंडोलमधील 75 हजारांचे लाच प्रकरण : शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांसह तिघांना जामीन


75,000 bribe case in Erandole: Bail to three including education institute president जळगाव : एरंडोल येथील शिक्षकाची धरणगाव येथे होणारी बदली रोखण्यासह शिक्षण विभागाकडे पाठवलेला प्रस्ताव रद्द करण्यासाठी 75 हजारांची लाच मागून ती मुख्याध्यापकांच्या नावाने धनादेशाद्वारे स्वीकारताना जळगाव एसीबीने एरंडोलच्या महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव (42), वरीष्ठ लिपिक नरेंद्र उत्तम वाघ (44) व श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन (56) यांना बुधवारी सकाळी अटक केली होती. संशयिताना गुरुवारी दुपारी जळगाव सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली व नंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

असे आहे लाच प्रकरण
पाचोरा येथील 40 वर्षीय तक्रारदार हे श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचलित एरंडोलच्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. त्यांच्यासह अन्य सहकारी शिक्षकाची धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये बदली करण्याबाबत 2 मे 2023 रोजी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता मात्र या बदलीला स्थगिती हवी असल्याने मुख्याध्यापक व वरीष्ठ लिपिकांनी तक्रारदार शिक्षकासह अन्य शिक्षकाकडे एका पगाराची रक्कम अर्थात 75 हजार रुपये लाच मागितल्याने या संदर्भात एसीबीकडे 13 रोजी तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर सापळा रचण्यात आला व बुधवारी सकाळी मुख्याध्यापकासह वरीष्ठ लिपिकाला लाचेचा धनादेश स्वीकारताच सुरूवातीला दोघांना नंतर अध्यक्षांना अटक करण्यात आली.

पोलीस कोठडीची मागणी फेटाळली
अटकेनंतर तिघा संशयिताना जळगाव सत्र न्यायालयात तपासाधिकारी निरीक्षक एन.एन.जाधव यांनी गुरुवारी दुपारी हजर करीत दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली मात्र दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली व नंतर जामिनासाठी अर्ज मंजूर करण्यात आल्यानंतर संशयितांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. तपास जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !