भुसावळात भाजपच्या डबा पार्टीत पक्ष संघटनावर चर्चा


भुसावळ : शहरातील भारतीय जनता पार्टीतर्फे डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात भाजप कार्यकर्त्यांची बुधवारी डबा पार्टी झाली. एकत्र जेवण करीत संवाद साधायचा, असे या पार्टीचे स्वरूप असल्याने आमदार संजय सावकारे यांनी यात सहभाग घेत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने मतदारसंघानिहाय स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ‘डबा पार्टी’चे आयोजन सुरू केले असून या उपक्रमास कार्यकर्त्यांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

भाजपा आमदारांसह पदाधिकार्‍यांची उपस्थिती
भाजपचे लोकप्रतिनिधी व नेत्यांचा थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ‘डबा पार्टी’चा पर्याय शोधण्यात आला आहे. या अनुषंगाने बुधवारी शहरात डॉ. मुखर्जी उद्यानात भाजपची डबा पार्टी रंगली. आमदार संजय सावकारे यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे व सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, पन्ना प्रमुख आदींसह सर्वसाधारण कार्यकर्ते उपस्थित होते. एकत्रीत जेवणाचा आनंद घेत आमदार संजय सावकारे यांनी पदाधिकार्‍यांना पक्षसंघटन वाढविण्याबाबत चर्चा केली. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचवा तसेच गेल्या काळात शासनाने राबविलेल्या योजनांमुळे सर्वसामान्यांना झालेले लाभ तळागाळापर्यंत पोहचवावे, असे आवाहन यावेळी आमदार सावकारे यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी किरण महाजन, बाजार समितीचे संचालक कैलास महाजन, युवराज लोणारी, सतीश सपकाळे, अजय नागराणी, निक्की बतरा, देवा वाणी, किरण कोलते. रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, अलका शेळके, शैलजा पाटील, धनराज बावस्किर, श्रेयस इंगळे, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

प्रतिष्ठीतांसोबत हितगुज उपक्रम
केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानाचा भाग म्हणून प्रतिष्ठीतांच्या गाठीभेटी घेण्याचा उपक्रम देखील भाजपने सुरु केला. यात बुधवारी शहरातील दहा ते 12 प्रतिष्ठीत नागरीक, व्यापारी, उद्योजकांच्या आमदार संजय सावकारे व खासदार रक्षा खडसे यांनी घरी जावून भेटी घेतल्या. केंद्र सरकारच्या कल्याणकारी उपक्रमांची या भेटीतून माहिती देत हितगुज साधण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !