भुसावळ शहरात रीपाइंची निदर्शने
कंडारी शिवारातील छायादेवी राका नगर, तक्षशीला नगरात मूलभूत सुविधांची मागणी
भुसावळ : रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयातर्फे गुरूवारी शहरातील पंचायत समितीसमोर निदर्शने करण्यात आली. रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात कंडारी शिवारातील छायादेवी राका नगर, तक्षशिला नगर येथील रहिवाशांना गटार, काँक्रीट रस्ते व स्ट्रीट लाईट, पाण्याची पाईप-लाईन आदी सुविधा मिळण्याची मागणी करण्यात आली.
कंडारी ग्रामपंचायत हद्दीतील तक्षशीला नगर व छायादेवी राका नगर भागात मोठ्या प्रमाणावर रहिवासी राहतात मात्र त्यांना मूलभूत सोयी-सुविधादेखील मिळत नाहीत. गटारींअभावी सांडपाणी तुंबते परीणामी नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या वस्त्यांमध्ये 90 टक्के काँक्रिटीकरणाचे रस्ते व डांबरीकरण न झाल्यामुळे पावसाळ्यात नागरीकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना सर्वाधिक त्रास सोसावा लागतो. रात्रीच्या वेळी या भागात पथदिवे बंद राहत असल्याने चोर्यांची भीती वाढली आहे. नागरी समस्या सोडवाव्यात तसेच कंडारी ग्रामपंचायतीने शासनाकडे निधीसाठी मागणी करावी, अशी मागणी करण्यात आली.

यांची निदर्शनप्रसंगी उपस्थिती
निदर्शनेप्रसंगी रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत वानखेडे, शरद सोनवणे, दीपक मगर, तालुकाध्यक्ष बालू सोनवणे, सुदाम सोनवणे, सुनील ढिवरे, विक्रांत प्रधान, सुनील तायडे, पप्पू सुरळकर, विश्वास खरात, डॉली वानखेडे, राजू इंगळे, विक्की वालकर आदी उपस्थित होते.
