Ajit Pawar अजित पवारांसह नऊ आमदारांवर पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका : कारवाईचा प्रस्ताव मंजूर
Nine MLAs including Ajit Pawar accused of breaching party discipline : Motion for action approved
मुंबई : राष्ट्रवादीला खिंडार पाडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी राज्यातील शिंदे-भाजपा सरकारला समर्थन देत रविवारी दुपारी शपथविधी उरकला. याचे पडसाद उमटण्यास आता सुरूवात झाली आहे. अजित पवारांसह नऊ आमदारांवर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे रविवारी शपथ घेतलेल्या अजित पवारांसह नऊ आमदारांवर पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
यांच्याविरोधात कारवाईचा प्रस्ताव मंजूर
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे, अदिती तटकरे आणि धर्मारावबाबा अत्राम यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. तसेच या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेल्या नेते मंडळींविरोधात पक्षाकडून बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रक काढले आहे.

राष्ट्रवादीत सुरू झाला सत्तासंघर्ष
गतवर्षी जून महिन्यात शिवसेनेत जे झाले होते, अगदी त्याच प्रकारे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. रविवारी अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. यानंतर पक्षाच्या मालकीवरून कायदेशीर लढाई सुरू होईल हे देखील स्पष्टच आहे.
सुप्रिया सुळे यांच्या पत्राची दखल
खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्याकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी केली होती. या मागणीला शरद पवारांनी मंजुरी दिली असून पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे. तसेच काल शपथ घेतलेल्या नऊ आमदारांवर पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात सुरूवात झाली.
9 आमदारांवर होणार कारवाई…
अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठी फूट पडली. कालच्या शपथविधीनंतर अजित पवार यांनी संपूर्ण पक्ष आमच्यासोबत असल्याचे सांगितले होते. मात्र शरद पवार यांनी या सर्वांची भूमिका पक्षविरोधी असल्याचे सांगत कारवाईला सुरूवात केली आहे. त्यानंतर आता पक्ष विरोधात जाऊन शपथ घेणार्या नऊ आमदारांविरोधात राष्ट्रवादीने कारवाई केली आहे. शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे, अदिती तटकरे आणि धर्मारावबाबा अत्राम यांच्यावर ही कारवाई होणार आहे.
