भुसावळ नगरपालिकेचे झोनल अधिकारी ‘अखेर बरखास्त’

मुख्याधिकार्‍यांचा आदेश प्रशासकांकडून रद्द : अधिकार्‍यांना दिलासा


Zonal Officer of Bhusawal Municipality ‘Finally Dismissed’ भुसावळ : शहराच्या विविध भागातील रस्त्यांसह पाणी व गटारींबाबत येत असलेल्या समस्यांचा ओघ पाहता व निवेदन देण्यासाठी मुख्याधिकार्‍यांच्या दालनात होणारी गर्दी पाहता नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी 24 प्रभागांसाठी झोनल अधिकार्‍यांची 6 जुलै 2023 रोजी नियुक्ती केली होती. संबंधित अधिकार्‍यांनी दररोज सकाळी तीन तास संबंधित प्रभागात जावून नागरीकांच्या समस्यांचे निरसन करणे असे कामाचे स्वरूप होते मात्र प्रभाग भेटीच्या नावाखाली अधिकारी पालिकेतून दांडी मारत असल्याचा प्रकार प्रांताधिकारी तथा प्रशासक असलेल्या जितेंद्र पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गुरुवार, 20 जुलै रोजी झोनल अधिकारी बरखास्त केले आहेत. संबंधित अधिकार्‍यांनी आता पालिकेत कार्यालयीन वेळेत आपापली कामे करावीत, असे आदेशात बजावण्यात आले आहे.

प्रशासकांच्या आदेशाने पालिका अधिकार्‍यांना दिलासा
प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी गुरुवार, 20 रोजी काढलेल्या आदेशानुसार, भुसावळ पालिकेत कर्मचारी तसेच अधिकारी संख्या आधीच कमी आहे. त्यातच वरीष्ठ कार्यालयातील मागवण्यात येणारी माहिती व विभागातील कामे विहित मुदतीत होत नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याने भुसावळ कार्यक्षेत्रातील एकूण 24 प्रभागातील झोनल अधिकार्‍यांची नियुक्ती रद्द करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रशासकांच्या आदेशामुळे पालिकेतील अधिकार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रशासकांच्या भेटीत अधिकारी होते गैरहजर
सोमवार, 17 जुलै रोजी प्रशासक जितेंद्र पाटील यांनी पालिकेला सरप्राईज व्हिजीट दिल्यानंतर दहा अधिकारी गैरहजर आढळल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती तर त्यातील सात अधिकारी हे प्रभागात असल्याचेदेखील समोर आल्यानंतर प्रशासकांकडे याप्रकरणी खुलासाही सादर करण्यात आला होता. प्रशासकांकडे पालिकेत अधिकारी थांबत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर त्यांनी सरप्राईज व्हिजीट देत अधिकारी, कर्मचार्‍यांची झाडाझडती घेतली होती.

आरोग्य निरीक्षकांनी पाडावी जवाबदारी : प्रांताधिकारी
पालिकेतील अधिकार्‍यांची झोनल अधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर संबंधित अधिकारी वॉर्डात न जाता घरी निघून जात होते त्यामुळे पालिकेची कामे होत नव्हती तसेच नागरीकांनादेखील मनस्ताप सोसावा लागत होता. ज्या पदासाठी ज्यांची नियुक्ती केली आहे तेच काम त्यांनी करायला हवे, असेही प्रांताधिकारी जितेंद्र पाटील म्हणाले. गुरुवारी आदेश काढून आपण झोनल अधिकारी बरखास्त केले आहेत. आता नियुक्त स्वच्छता निरीक्षकांनी प्रभागातील स्वच्छतेच्या समस्या सोडवाव्यात, असेही प्रांताधिकारी म्हणाले.

खडका रोडवर अस्वच्छता : मुकादमाला नोटीस
शहरातील खडका रोडसह शांती नगर परीसरातील विवेकानंद शाळेच्या परीसरातत अस्वच्छता असल्याच्या तक्रारी आल्यानंतर प्रांताधिकारी तथा प्रशासक जितेंद्र पाटील यांनी गुरुवारी सकाळी व सायंकाळी या भागात अचानक भेट देत पाहणी केल्याने खळबळ उडाली. अस्वच्छतेसाठी कारणीभूत असलेले मुकादम यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने स्वच्छता कर्मचार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली. प्रशासक पाटील यांनी खडकारोडसह अन्य भागात दोन दिवसांपूर्वीच पाहणी करीत नागरीकांच्या समस्या जाणल्या. पालिकेत कर्मचारी, विभाग प्रमुखांची बैठक घेत त्यांना कामाच्या दृष्टीने सूचना केल्यात. पालिकेत कर्मचार्‍यांमध्ये आलेली मरगळ झटकण्याचे काम सुरू झाल्यानंतर नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नालेसफाईबाबत ठेकेदाराला तंबी
शहरातील नाल्यांची सफाई व्यवस्थित होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर ठेकेदाराला प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी गुरुवारी चांगलीच तंबी दिल्याचे सांगण्यात आले. तीन ते चार दिवसात नालेसफाईचे काम चांगल्या पद्धत्तीने करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी केल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !