वाचनालयाकडे येणारी पावले वाढली पाहिजेत : डीवायएसपी कृष्णात पिंगळे :
भुसावळ शहरात सार्वजनिक वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन
भुसावळ : व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन आवश्यक आहे. वाचनामुळे आपली विचार करण्याची क्षमता वाढत जाऊन आपण मानसिकरित्या सक्षम होत जातो त्यामुळे आधुनिक काळात वाचनाची विविध साधने उपलब्ध असली तरी वाचनालयाकडे येणारी पावले वाढली पाहिजेत, असे प्रतिपादन भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी केले.
ग्रंथप्रदशर्नाचे उद्घाटन
भुसावळातील डी.एस.हायस्कूललगत असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या 153 व्या वर्धापनदिनी आयोजित ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी के. नारखेडे विद्यालयाचे प्राचार्य नितीन किरंगे, म्युनिसिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक ललित फिरके, बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.जगदीश पाटील, वाचनालयाचे ग्रंथपाल नितीन तोडकर यांची उपस्थिती होती. डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्याहस्ते फीत कापून ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रास्ताविक ग्रंथपाल नितीन तोडकर यांनी वाचनालयाचा इतिहास सांगून वाचनालयातर्फे राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डीवायएसपी कृष्णात पिंगळे हे नुकतीच एलएलबी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सहृदय सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ.जगदीश पाटील यांनी तर आभार सहाय्यक ग्रंथपाल अवधूत दामोदरे यांनी मानले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष हिंमत ठाकूर (मुन्नाभाऊ), संचालक हरीश पाटील, मिलिंद भारंबे, कोटेचा महाविद्यालयातील प्रा. आर.एच. पाटील, भुसावळ गट साधन केंद्रातील विषय तज्ज्ञ संजय गायकवाड, प्रसाद काळवीट, रमेश पाटील, सुवर्णा बोरसे, अनिल गुजराथी, राजेश मोरे, राजाराम डोमसे, विनोद हासे, वाचनालयाचे सहाय्यक ग्रंथपाल अवधूत दामोदरे, सेवक होनाजी चौधरी यांच्यासह वाचकांची उपस्थिती होती.
